Wed, Apr 01, 2020 23:02होमपेज › Marathwada › नांदेड जि.प.वर ‘महिला राज’

नांदेड जि.प.वर ‘महिला राज’

Last Updated: Jan 22 2020 2:12AM
नांदेड : पुढारी वृत्तसेवा

नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या मंगाराणी अंबुलगेकर व उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या पद्मारेड्डी सतपलवार यांची निवड झाल्यामुळे जिल्हा परिषदेवर महिला राज आले आहे. जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच महिलेला उपाध्यक्षपदाची संधी मिळाली आहे.

जिल्हा परिषदेत काँग्रेसचे 28 सदस्य असून त्यापैकी 17 महिला आहेत. भाजपचे 13 सदस्य आहेत. त्यापैकी 5 महिला सदस्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 10 सदस्यांपैकी 6 महिला आहेत. शिवसेनेचे 10 सदस्य असून त्यापैकी 5 महिला आहेत. अपक्ष 2 सदस्य असून त्यापैकी 1 महिला सदस्या आहे. एकूण 63 सदस्यांपैकी 34 महिला सदस्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेत महिलांचे संख्याबळ जास्त आहे. आता अध्यक्ष व उपाध्यक्षपद महिलेला मिळाले आहे. त्यामुळे यावेळी जिल्हा परिषदेवर एकप्रकारे महिला राज आले आहे.

जिल्हा परिषदेच्या पहिल्या महिला अध्यक्षा होण्याचा मान किनवट तालुक्यातील जनाबाई डुडूळे यांनी 1997 साली मिळविला होता. त्यानंतर मुखेडच्या वैशाली चव्हाण यांनी अध्यक्षपद भूषविले होते. वैशाली चव्हाण यांच्यानंतर मंगलाताई गुंडले व शांताबाई जवळगावकर यांनी अध्यक्षपद भूषविले आहे. मंगाराणी अंबुलगेकर पाचव्या महिला अध्यक्षा आहेत. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद अनेक दिग्गज पुरूष नेत्यांनी भूषविले असून जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच उपाध्यक्षपद भूषविण्याची संधी महिलेस मिळाली आहे. तो मानही धर्माबाद तालुक्याने मिळविला आहे.

पहिले अध्यक्ष, उपाध्यक्षपद शिवसेनेलाच
जिल्हा परिषदेच्या पहिल्या महिला अध्यक्षा होण्याचा बहुमान शिवसेनेच्या जनाबाई डुडूळे यांना मिळाला होता. त्यानंतर तब्बल 21 वर्षांनी जिल्हा परिषदेच्या पहिल्या महिला उपाध्यक्षा होण्याचा बहुमानही पद्मारेड्डी सतपलवार यांच्या रूपाने शिवसेनेलाच मिळाला आहे. हा जिल्हा परिषदेच्या इतिहासातील योगायोग ठरला आहे.