Wed, Aug 12, 2020 09:05होमपेज › Konkan › कोकण कृषी विद्यापीठ करतयं काय?

कोकण कृषी विद्यापीठ करतयं काय?

Published On: Apr 17 2018 10:41PM | Last Updated: Apr 17 2018 10:17PMरत्नागिरी : प्रतिनिधी

निसर्गाच्या दुष्टचक्रात आंबा अडकल्याने शेतकर्‍यांसमोर अनंत अडचणी उभ्या आहेत. आंब्यात ल्हासा आढळण्याचे प्रमाण वाढत आहे. खार पडल्याने आंब्यावर काळे डाग पडत आहेत. झाडाला आंबे पाहिजे त्या प्रमाणात लागत नाहीत. असे असताना कोकण कृषी विद्यापीठ काय करत आहे? असे खडेबोल पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी सुनावले.

कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे हातखंबा येथे दि.17 एप्रिल ते 27 मे या कालावधीत आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन ना. वायकर यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाधिकारी प्रदीप पी., जि. प. अध्यक्षा स्नेहा सावंत, नगराध्यक्ष राहुल पंडित, पं. स. सभापती मेघना पाष्टे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मधुकर दळवी आदी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना ना. वायकर म्हणाले की, कोकण कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी आंब्यावर संशोधन करणे आवश्यक आहे. शास्त्रज्ञांनी शेतकर्‍यांची कार्यशाळा घ्यावी. आपले संशोधन शेताच्या बांधापर्यंत पोचवावे. शेतकरी सक्षम कसा होईल, हे पहावे. 

शेतकर्‍याला फायदा मिळवून देणे हे बाजार समितीचे मुख्य कार्य आहे. जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी 200 कोटींची उचल घेतली आहे. त्या तुलनेत त्यांना उत्पन्न मिळाले पाहिजे. यंदाचा आंबा महोत्सव छोट्या प्रमाणात असला तरी यापुढे त्याची व्याप्ती वाढली पाहिजे, यासाठी आवश्यक ती मदत करू, असे आश्‍वासनही त्यांनी दिले. 

शेतकर्‍यांना चांगल्या सुविधा द्या : प्रदीप पी.

कृषी उत्पन्न बाजार समितीने आंबा महोत्सव आयोजित करून शेतकर्‍यांना बाजारपेठ मिळवून दिली आहे. पण आंबा महोत्सवाची जाहिरात मोठ्या प्रमाणात होण्यासाठी याचे स्वरुप मोठ्या प्रमाणात हवे. त्याचप्रमाणे येथे उभारलेल्या स्टॉलवर शेतकर्‍यांना चांगल्या सुविधा द्या, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी केले.