Tue, Jun 15, 2021 13:34
‘व्हिस्टाडोम’मधून प्रवाशांना निसर्ग सौंदर्याचा आविष्कार

Last Updated: Jun 11 2021 2:50AM

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा

गोव्याच्या तोडीस तोड असणारे कोकणचे निसर्गसौंदर्य पर्यटकांना नेहमीच भुरळ घालत असते. डोंगरातून कोसळणारे धबधबे, खळाळणार्‍या नद्या, पावसाळ्यातील शिवार, हिरवेगार डोंगर मन मोहून टाकत असते. हा स्वर्गीय अनुभव प्रवासादरम्यान मिळणार असून, कोकण रेल्वेच्या मार्गावर जनशताब्दी एक्स्प्रेसला जोडण्यात आलेल्या ‘व्हिस्टाडोम कोच’मधून कोकणचा निसर्ग अनेक प्रवाशांना अनुभवता आला.
आरामदायी प्रवास आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी कोकण रेल्वेने ‘व्हिस्टाडोम कोच’ तयार केला असून, यात नव्याने बदल करण्यात आले आहेत. या बदलेला ‘व्हिस्टाडोम कोच’ला घेऊन जनशताब्दी गुरुवारी पहिल्यांदाच कोकण रेल्वे मार्गावरून धावली.

खरेतर कोकण रेल्वे ज्या मार्गावरून धावते त्या मार्गावरील निसर्गसौंदर्य प्रत्येकाला भुरळ पाडते. आजूबाजूला डोळे सुखावणारी हिरवाई, निळे आकाश, डोंगरमाथे आणि पावसाळ्यात ओसंडणारे धबधबे स्वर्गीय अनुभव देतात आणि प्रवास सुखकर होतो. मात्र नेहमीच्या रेल्वेच्या गाडीतून हा अनुभव पूर्णपणे मिळतोच असे नाही. प्रवाशांच्या या आवडीला डोळ्यासमोर ठेवून कोकण रेल्वेने व्हिस्टाडोम बोगी तयार केली आहे. या स्पेशल बोगीला प्रशस्त काचा बसवण्यात आल्यात, यामुळे ट्रेनच्या खुर्चीत बसून एक चांगला अनुभव घेता येतो. 

मोठमोठ्या खिडक्यांबरोबरच बोगीत प्रशस्त जागा आहे. यातील खुर्च्या मागे पुढे होतातच पण गोलही फिरतात, यामुळे प्रवासी आपल्याला हव्या तशा खुर्च्या अ‍ॅडजस्ट करू शकता. या स्पेशल बोगीत फ्रीज, डीप फ्रीज  बरोबरच ओव्हन व अन्य सुविधा आहेत. 

गुरुवारी सकाळी रत्नागिरी रेल्वे स्थानकावर या स्पेशल रेल्वेचे आगमन झाले. 10 मिनिटे थांबा घेऊन ही रेल्वे पुढील प्रवासाला मार्गस्थ झाली. यापूर्वी जनशताब्दी एक्स्प्रेसला व्हिस्टाडोम कोच बसवण्यात आला होता. त्यावेळी आठवड्यातून तीनवेळा तो शताब्दीला जोडण्यात येत असे. मात्र आता या व्हिस्टाडोम कोचमध्ये नव्याने बदल करण्यात आले आहेत. हा कोच आता नियमित जनशताब्दीला जोडण्यात येणार आहे.

छप्परही काचेचे अन्...

सर्व सोयीसुविधा असणारी ही रेल्वे पर्यटक प्रवाशांना सुखावणारी आहे. याच व्हिस्टाडोम कोचचा पहिला प्रवास गुरुवारी कोकण रेल्वे मार्गावरून झाला. या बोगीचे छप्परही काचेचे असून, बोगीच्या मागील बाजूचे दालन विशेष आहे. यात उभे राहून मोठ्या काचेतून कोकणचा निसर्ग अनुभवता येतो.