होमपेज › Konkan › वाढत्या तापमानाने पाणीटंचाईची तीव्रता वाढली

वाढत्या तापमानाने पाणीटंचाईची तीव्रता वाढली

Published On: May 21 2018 1:18AM | Last Updated: May 21 2018 1:18AMरत्नागिरी : प्रतिनिधी

पूर्व मोसमीच्या प्रतीक्षेत अवकाळी पावसाचा जोर सुरू झाला असला तरी त्यामुळे तापमानात होणार्‍या वाढीने जिल्ह्यातील पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे. जिल्ह्यात 29 गावांतील 80 वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. ही  आकडेवारी कागदावर असली तरी प्रत्यक्षात 100 वाड्यांमध्ये सध्या पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. वाढत्या उष्म्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागात जलस्तर घटू लागला असून अनेक गावांमध्ये पाण्यासाठी वणवण  करावी लागत आहे.

मे महिन्याच्या अखेरीस टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढत आहे. खेड, चिपळूण, संगमेश्‍वर आणि लांजा या चार तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. टँकरची मागणी आल्यानंतर प्रथम पर्यायी व्यवस्था स्थानिकस्तरावर  केली जात आहे. त्यांना जवळच्या विहिरीवरून पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यात यश आले नाही, तर टँकरचा अवलंब होतो. धनगरवाड्यांमध्ये साठवण टाक्यांचा पर्याय उपलब्ध केल्याने टँकरची  संख्या आटोक्यात असल्याचे प्रशासकीय सुत्रांनी सांगितले. पारा 34 ते 36 अंश सेल्सिअसमध्ये राहिला असून कडाक्याच्या उन्हाने पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे. पाण्याचा वापर आणि बाष्पीभवन यामुळे साठा घटत आहे. दुर्गम भागात किंवा किनारपट्टी भागात असलेल्या वाड्यावस्त्यांना सर्वाधिक पाणीटंचाईची झळ बसत आहे.

रत्नागिरी तालुक्यातील नेवरे, काजरभाटी  गावातील तीन वाड्या तहानलेल्या आहेत. तेथील ग्रामपंचायतींकडून स्थानिक विहिरीतून खासगी टँकरने पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे. तापमान वाढीने जलस्तर घटत चालले असल्याने आता बिगर मोसमीची प्रतीक्षा जिल्ह्यात सुरू झाली आहे. वाढत्या तापामानाने खरीपाच्या बेगमीची कामे संथ गतीने सुरू आहेत. पर्हे आणि डुरे कोरडे होऊ लागल्याने जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची समस्याही वाढू लागली आहे. 

पूर्व मोसमी बरोबरच मोसमी पावसाचे आगमन लांबल्यास जिल्ह्यात पाणी टंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे. मात्र, बिगर मोसमी बरोबरच मोसमी पावसाने प्रतिक्षा करायला लावल्यास अखेरच्या टप्प्यात अनेक गावांमध्ये टँकरची मागणी वाढेल, अशी स्थिती आहे. प्रशसकीय कागदावर वाड्यांची संख्या 56 वर असली तरी प्रत्यक्षात टंचाईच्या वाड्यावाढलेल्या असल्याचे सुत्रांनी सांगितले. या वाड्यांना स्थानिकस्तरावर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तर अनेक भागात खासगी संस्थांच्या मदतीने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये 51 टक्के पाणीसाठा
जिल्ह्यातील 45 पाटबंधारे प्रकल्पात 51 टक्के पाणीसाठा आहे. तसेच एमआयडीसीअंतर्गत पाचपैकी तीन बंधार्‍यांतील साठा संपुष्टात आला आहे. शिल्लक दोन धरणात सरासरी चाळीस टक्के साठा आहे. जिल्ह्यातील 45 पाटबंधारे प्रकल्पात उपयुक्‍त साठा 414 दलघमी असून आजचा साठा 214 दलघमी आहे. फणसवाडी, मालघर या धरणात पाणीसाठो कमी होत आहे. गतवर्षी रत्नागिरी विभागातील 28 धरणांमध्ये 34 टक्के साठा होता. यावर्षी तो 38 टक्केपर्यंत आहे. नातूवाडी, गडनदी आणि अर्जुना धरणात 64 टक्के साठा आहे. हा साठा मे अखेरपर्यंत समाधानकारक आहे.