होमपेज › Konkan › कुडाळसह सिंधुदुर्गात अकरा दिवसांच्या गणरायांना भावपूर्ण वातावरणात निरोप

गणपती गेले गावाला, चाकरमानी चालले परतीच्या प्रवासाला!

Published On: Sep 12 2019 8:16PM | Last Updated: Sep 12 2019 10:31PM

कुडाळ : तालुक्यात अकरा दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करण्यात आले.कुडाळ : काशिराम गायकवाड 

गणपती बाप्पा मोरया..मंगलमूर्ती मोरया...गणपती गेले गावाला चैन पडे ना आम्हाला...गणपती मोरया पुढच्या वर्षी लवकर या..अशा जयघोषात ढोलताश्यांच्या गजरात फटाक्यांचा आतषबाजीत गुरूवारी कुडाळ तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात अकरा दिवसांच्या गणरायांचे भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यात आले.

कुडाळ, कणकवली, वैभववाडी, देवगड, मालवण, वेंगुर्ले, दोडामार्ग व सावंतवाडी आदी सर्वच तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात फटाक्यांचा आतषबाजी, ढोलताशांच्या गजरात मिरवणूका काढण्यात आल्या. नदि, तलाव, ओहोळ आदी ठिकठिकाणी अकरा दिवसांच्या गणपतीचे भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यात आले. गणेश घाट ठिकाणी गणेशभक्तांची मोठी गर्दी झाली होती. ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रात्रीपर्यंत गणेश विसर्जनाचा उत्साह सुरू होता.

गेले चार दिवस पावसाने काहीशी उघडीप दिली. त्यामुळे गणेश भक्तांनी मोठ्या उत्साहात गणपती बाप्पांना वाजत गाजत निरोप दिला. गणपती विसर्जनानंतर मुंबईकर चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागले आहेत. दरम्यान कुडाळ येथील सिंधुदुर्ग राजाची विसर्जन मिरवणूक सायंकाळी ओरोसच्या पुढे गेली. रात्री मालवण येथे समुद्रात सिंधुदुर्ग राजाचे मोठ्या थाटात विसर्जन करण्यात येणार आहे.