Thu, Jan 30, 2020 02:40होमपेज › Konkan › जि.प. विषय समिती सभापती निवडी बिनविरोध

जि.प. विषय समिती सभापती निवडी बिनविरोध

Last Updated: Jan 15 2020 1:45AM
ओरोस : प्रतिनिधी 

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सभापती निवडीत भाजप नेते खा. नारायण राणे यांनी नेहमीप्रमाणे यावेळीही धक्‍कातंत्राचा वापर केला. समाजकल्याण सभापतिपदी शारदा कांबळे, महिला व बालकल्याण सभापतिपदी माधुरी बांदेकर, वित्त व बांधकाम सभापतिपदी बाळा जठार, शिक्षण व आरोग्य सभापतिपदी सावी लोके यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीकडे शिवसेनेच्या सदस्यांनी पाठ फिरवली.

जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडणूक मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा शिंगणे यांच्या उपस्थितीत झाली. सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनी   दुपारी 12 वा. गटनेते रणजित देसाई, अध्यक्ष समिधा नाईक, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केले. अर्ज दाखल करण्याच्या दुपारी 3.30 वा. या निर्धारीत वेळेत केवळ सत्ताधारी सदस्यांचे चार अर्ज दाखल झाल्याने  व याबाबत कुणाचाही आक्षेप न  आल्याने  निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा शिंगणे यांनी अनुक्रमे समाजकल्याण समिती सभापती- शारदा कांबळे, महिला बालकल्याण समिती सभापती - माधुरी बांदेकर तर विषय समिती सभापतिपदासाठी  बाळा जठार व सावी लोके यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. निवडीनंतर उपस्थित जि. प. सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले. जि. प. अध्यक्षा समिधा नाईक, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेेकर यांच्यासह सर्व जि. प. सदस्य, गटनेते रणजित देसाई, प्रशासनाच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी स्वागत केले. यावेळी तालुका आणि मतदारसंघांतील कार्यकर्त्यांनी सभागृहाबाहेर गर्दी केली होती.