Mon, Aug 10, 2020 04:43होमपेज › Konkan › चिपळूण : शालेय पोषण आहाराचा सडलेला तब्बल २२ टन साठा आढळला! (video)

चिपळूण : शालेय पोषण आहाराचा सडलेला तब्बल २२ टन साठा आढळला! (video)

Last Updated: Jul 10 2020 8:53PM
चिपळूण : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील खडपोली एमआयडीसीतील एका बंद कारखान्याच्या शेडमध्ये शालेय पोषण आहाराचा सडलेला साठा आढळून आला आहे. खडपोली ग्रामपंचायत व चिपळूण पंचायत समितीच्या सभापती धनश्री शिंदे यांनी या गोडाऊनवर धाड टाकून हा प्रकार उघडकीस आणला. विशेष म्हणजे येथून संपूर्ण जिल्ह्याला पोषण आहाराचे धान्य वितरीत केले जात असल्याची धक्कादायक माहिती मिळाली.

अधिक वाचा : तब्‍बल २२ तासांच्या अथक प्रयत्नानंतर कशेडी घाटातून वाहतूक सुरू, पण...

याबाबत मिळालेल्या माहिती अशी, एका बंद कारखान्याचे गोडाऊनमध्ये रुपांतर केलेल्या ठिकाणी एकूण २२ टन धान्य आढळले. त्यामध्ये १५ टन तांदूळ तर ७ टन डाळीचा समावेश आहे. पण यातील सुमारे ४० टक्के धान्य हे सडलेले व दुर्गंधी सुटलेले असल्याचे आढळले. हा साठा माहेश्वरी बचत गट, बीड यांनी केलेला आहे. विशेष म्हणजे हा सडलेला साठा मोठ्या फॅनवर सुकवण्याचे काम सुरू होते.

येथील मुराद अडरेकर व इतर ग्रामस्थांनी हा प्रकार पाहिल्यानंतर त्यांनी पंचायत समिती सभापती धनश्री शिंदे, सरपंच रोशनी पवार, तलाठी, ग्रामसेवक, माजी सरपंच मुस्कान अडरेकर, संतोष कदम, प्रवीण पवार, सुरेंद्र कदम, धीरज खेडेकर तसेच संदीप चिपळूणकर यांना कळविले. या सर्वांनी या गोडाऊनवर धाड टाकत हे गोडाऊन सील केले. 

अधिक वाचा :  रत्नागिरी जिल्ह्यात 26 नवे रुग्ण

यावेळी काळ्या पडलेल्या डाळी खराब झालेले तांदुळ निदर्शनास आले. तसेच बोगस कंपन्यांचे भेसळयुक्त मसाले आढळून आले. या गोडाऊनच्या चारही बाजूने घाणीचे साम्राज्य तसेच गटारांची दुर्गंधी पसरलेली आहे. माशांमुळे गोडाऊनला घाणीचे स्वरुप आलेले आहे. अशा परिस्थीत या ठिकाणी या सडलेल्या धान्यांचे पॅकिंग सुरु होते. यावेळी हे पॅकिंग करुन हे धान्य जनावरांसाठी खाद्य म्हणून वापरणार असल्याचे बचत गट प्रमुखाने सांगितले.

अधिक वाचा :  कोकणात दोन दिवस वादळी पावसाचा इशारा

यावेळी संबधीत पदाधिकारी व अधिकाऱ्यांकडून सर्व धान्य ताब्यात घेऊन गोडाऊन सील करण्यात आले. या आधीही येथील ग्रामस्थानी पोषण आहारात मुलांना सडलेले धान्य मिळत असल्याची तक्रार केली होती. आता या धाडीनंतर संबधीत बचतगटावर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.