Wed, Aug 12, 2020 13:15होमपेज › Konkan › धोकादायक इमारतींमध्येच शिक्षणाचे धडे

धोकादायक इमारतींमध्येच शिक्षणाचे धडे

Published On: Jun 14 2019 1:54AM | Last Updated: Jun 13 2019 9:44PM
रत्नागिरी ः प्रतिनिधी

जिल्हा परिषद शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील 713 शाळांमधील 1440 वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी 24 कोटी 17 लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे धोकादायक इमारतीत विद्यार्थ्यांना धडे घ्यावे लागणार आहेत.

पावसाळा तोंडावर आलेला असताना शाळांची गळकी छपरे ही मोठी समस्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांपुढे प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारा आहे. गतवर्षी जिल्हा नियोजनमधून प्राप्त झालेल्या अडीच कोटी निधीतून 136 शाळांच्या दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर आहे. मंडणगड तालुक्यात 41 शाळांमधील 70 वर्गखोल्यांसाठी 99.35 लाख, दापोलीतील 104 शाळांमधील 240 वर्गखोल्यांसाठी 4 कोटी 64 लाख, खेड तालुक्यात 135 शाळांमधील 285 वर्गखोल्यांसाठी 3 कोटी 21 लाख, गुहागर तालुक्यात 53 शाळांमधील 105 वर्गखोल्यांसाठी 2 कोटी 97 लाख, चिपळूण तालुक्यातील 83 शाळांमधील 186 वर्गखोल्यांसाठी 3 कोटी 9 लाख, संगमेश्‍वर  तालुक्यातील 81 शाळांमधील 174 वर्गखोल्यांसाठी 3 कोटी 48 लाख, रत्नागिरी तालुक्यातील 102 शाळांमधील 169 वर्गखोल्यांसाठी 3 कोटी 2 लाख, लांजा तालुक्यातील 76 शाळांमधील 155 वर्गखोल्यांसाठी 1 कोटी 93 लाख आणि राजापूरमधील 38 शाळांमधील 56 वर्गखोल्यांसाठी 81 लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. खेड तालुक्यातील सर्वाधिक 135 शाळांमधील 285 वर्गखोल्या नादुरुस्त आहेत.

सर्व शिक्षा अभियानामधून पूर्वी नवीन वर्गखोल्या बांधणे किंवा दुरुस्त करणे यासाठी लाखो रुपयांचा निधी मिळत होता; मात्र, गेल्या चार ते पाच वर्षांपासून वर्गखोल्यांसाठी वेगळा निधी शासनाकडून आलेला नाही. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी शाळा दुरुस्ती करण्यासाठी शिक्षण विभागाची कसरत होत आहे. 

सन 2018-19 या आर्थिक वर्षासाठी नियोजनमधून दुरुस्तीसाठी अडीच कोटी रुपये  निधी मंजूर झाला होता. त्यामधून अत्यावश्यक दुरुस्तीच्या शाळांची निवड करण्यात आली आहे. सध्या मात्र सर्वच शाळांची दुरुस्ती करण्यासाठी 24 कोटी 17 लाखांची गरज असल्याने शिक्षण विभागही अडचणीत सापडला आहे.