होमपेज › Konkan › बीच शॅकद्वारे कोकणी पर्यटनाला चालना

बीच शॅकद्वारे कोकणी पर्यटनाला चालना

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

रत्नागिरी : प्रतिनिधी

समृद्ध सागरी किनार्‍यावर झापाच्या टुमदार झोपड्यात (बीच शॅक) रेलणार्‍या आरामखुर्चीत निवांत बसून खमंग, चटपटीत अशा कोकणी पदार्थांचा आस्वाद घेणं कोणाला नाही आवडणार...! आतापर्यंत ही पर्वणी साजरी करायला गोव्याला जायला लागायचे; परंतु, लवकरच कोकणातील  सागर किनार्‍यांवरही ‘बीच शॅक्स’च्या रांगा आणि कोकणी खाद्यपदार्थांची रेलचेल अनुभवायला मिळणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) ’बीच शॅक’ धोरणाचा मसुदा तयार केला असून, लवकरच हे धोरण प्रत्यक्षात येण्याची चिन्हे आहेत.  

कोकणातील पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी 720 किलोमीटर लांबीच्या किनार्‍यावर गोव्याच्या धर्तीवर ’बीच शॅक्स’ सुरू करण्यासाठी मंडळाकडून परवाना बंधनकारक आहे, त्यासाठी व्यावसायिकांना अनेक नियमांची अंमलबजावणी करणे अनिवार्य असेल. परदेशी नागरिकांना मात्र या शॅक्सचा परवाना मिळणार नाही. समुद्रकिनार्‍यावरील पर्यावरणाचे संवर्धन करत शॅक्सची रचना कशाप्रकारे असावी, स्वच्छतागृहे, आपत्कालीन व्यवस्था याविषयी सविस्तर उल्लेख धोरणाच्या मसुद्यात आहे. ’शॅक्स’जवळ सीफूड आणि मद्यविक्रीला परवानगी मिळणार आहे. मात्र, हुक्का आणि अमली पदार्थ सेवनास बंदी घातली आहे. 

गोव्याप्रमाणे हे शॅक्स पावसाळ्यात बंद ठेवण्याची सूचनाही धोरणात केली आहे. ‘बीच शॅक्स’ हे केवळ सप्टेंबर ते मे या कालावधीत आणि सकाळी सात ते साडेअकरा या वेळेतच सुरू ठेवता येणार आहेत. कोकणातील प्रत्येक जिल्ह्यानुसार किनार्‍यावर किती शॅक्स असतील, याचा आकडा धोरणाला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर जाहीर करण्यात येईल. मात्र, ’बीच शॅक्स’मुळे समुद्रकिनार्‍यावरील पर्यावरणाबरोबरच कोकणी पर्यटन संस्कृतीही धोक्यात येण्याची शक्यता या नव्या पर्यटन धोरणामुळे व्यक्त होत आहे.कोकणचे समुद्र किनारे पर्यटकांना नेहमीच भुरळ घालतात. त्यात या समुद्रकिनारी शॅक उभारून निवांत समुद्राची गाज अनुभवावयाची असेल तर त्याची मज्जा वेगळीच! आता ‘एमटीडीसी’ने बीच शॅक्सची संकल्पना प्रत्यक्षात आणण्याची पावले उचलल्याने कोकणच्या सागरी पर्यटनाला अच्छे दिन येणार आहेत.