Tue, Oct 20, 2020 11:52होमपेज › Konkan › डॉन दाऊदच्या खेड येथील मालमत्ता लिलावाची उत्सुकता

डॉन दाऊदच्या खेड येथील मालमत्ता लिलावाची उत्सुकता

Last Updated: Oct 18 2020 1:13AM
खेड  ः पुढारी वृत्तसेवा

कुख्यात अंडरवल्ड डॉन दाऊद इब्राहिम कासकर याच्या खेड तालुक्यातील तेरा मालमत्तांचे मूल्यांकन करण्यासाठी सोमवार दि. 17 जून 2019 रोजी स्मगलर अँड फॉरेन एक्स्चेंज म्यानीपुलेटर्स  (साफेमा) या विभागातील अधीक्षक प्रवीण गजबे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सुरू केलेली मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण झाली असून तालुक्यातील मुंबके येथील दाऊद इब्राहिम कासकर याची आई अमिना कासकर यांच्या नावे असलेला बंगला व अन्य मालमत्तांची आता ऑनलाईन विक्री प्रक्रिया सुरू झाली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील कुख्यात डॉन दाऊद याच्या मालमत्ता विकत घेण्यासाठी कोण पुढे येणार याची उत्सुकता खेडमध्ये शिगेला पोहोचली आहे.

दाऊद इब्राहिम कासकर व त्याच्या नातेवाईकांच्या देशभरात विखुरलेल्या मालमत्ता यापूर्वीच भारत सरकारने ताब्यात घेतल्या आहेत. सुमारे दीड वर्षभरापूर्वी दाऊदच्या मुंबईतील मालमत्तांचा लिलाव करून त्यांची विक्री करण्यात आली होती. खेड तालुक्यातील मुंबके हे दाऊदचे मूळ गाव असून त्या ठिकाणी असलेल्या मालमत्ता देखील भारत सरकारने ताब्यात घेतल्या आहेत. या मालमत्तांचा देखील लिलाव करून विक्री करण्यात येणार असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी धडकले होते.

भारत सरकारच्या स्मगलर अ‍ॅण्ड फॉरेन एक्सचेंज  म्यानीपूलेटर्स (साफेमा) या विभागाच्या एका पथकाने सोमवार दि.17 जून 2019 रोजी खेड तालुक्यात दाऊद इब्राहिम कासकर याच्या मालमत्तांची पाहणी केली होती. या पथकाचे नेतृत्व अधिक्षक प्रविण गजबे यांच्याकडे होते. मुंबके येथील दाऊदची आई अमिना कासकर यांच्या नावे असलेल्या बंगल्याची व अन्य मालमत्तांची त्यांनी महसूलचे अधिकारी व भूमिअभिलेख अधिका़र्‍यांसोबत पाहणी केली होती. यावेळी ‘सफेमा ’चे कर्मचारी सुयोग कुंभार, मुंबकेचे सरपंच अकबर दुदुके, तलाठी खेडेकर, पोलीस पाटील उपस्थित होते. दाऊद इब्राहिम कासकर याच्या व त्याच्या कुटुंबीयांच्या नावे खेडमध्ये 13 मालमत्ता असून भारत सरकारने यापूर्वीच त्याचा ताबा घेतला आहे. त्यामध्ये मुंबके गावातील बंगल्यासह अकरा व लोटे येथील एका मालमत्तेचे मूल्यांकन करण्याची प्रक्रीया जून2019 मध्ये सुरू झाली होती. या मालमत्तापैकी खेडमधील मालमत्तांचे मूल्य निर्धारित झाले असून त्यांची ऑनलाईन विक्री प्रक्रिया नोव्हेंबर 2020 मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. लिलावात सहभागी होणारे दि. 6 नोव्हेंबर रोजी ‘साफेमा’कडे अर्ज करून व अनामत रक्कम भरून लिलावात सहभागी होणार आहेत. तर  दि. 10 नोव्हेंबर रोजी ऑनलाईन लिलाव करण्यात येईल, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. दाऊदचा बंगला व अन्य मालमत्ता या खेडवासीयांप्रमाणेच संपूर्ण देशासाठी कुतूहलाचा विषय बनल्या असून गुन्हेगारी जगातील या डॉनची मालमत्ता विकत घेण्यासाठी लिलावात कोणकोण सहभागी होते याची उत्सुकता लागून राहिली आहे.
 

 "