Wed, Aug 12, 2020 10:03होमपेज › Konkan › रिफायनरी बाबत शिवसेनेचा चेहरा उघडा पाडणार : राणे

रिफायनरी बाबत शिवसेनेचा चेहरा उघडा पाडणार : राणे

Published On: Jan 17 2018 1:58AM | Last Updated: Jan 16 2018 10:06PM

बुकमार्क करा
मालवण : प्रतिनिधी

सत्तेत असणार्‍या शिवसेनेने ग्रीन रिफायनरीला विरोध दर्शविला आहे. सध्या नाणारमध्ये अनेक बडी बडी नेतेमंडळी येताहेत आणि रिफायनरीला विरोध सांगतााहेत. या बड्या नेत्यांचे कोकणच्या विकासात योगदान काय? असा खडा सवाल करत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी ग्रीन रिफायनरी बाबत शिवसेनेची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप केला. रिफायनरी बाबत शिवसेनेचा खरा चेहरा आपण नाणारमध्ये जाऊन उघडकीस आणणार, असा इशारा त्यांनी दिला.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे हे मालवण येथील त्यांच्या नीलरत्न निवासस्थानी आले असता त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. नारायण राणे म्हणाले, नाणारमध्ये दररोज अनेक बडीबडी नेतेमंडळी येत आहेत. आपण ग्रामस्थांबरोबर असल्याचे ते सांगत आहेत. या बड्या नेत्यांचे कोकणच्या विकासात योगदान कोणते? कोकण विकासासाठी त्यांनी आजपर्यंत काय केले? कोणते प्रकल्प त्यांनी याभागात आणले? असे प्रश्‍न  करत  राणे यांनी या प्रश्‍नी शिवसेनेवर ‘प्रहार’ केला. आजपर्यंत शिवसेनेने कोकणबाबत दुटप्पी भूमिका घेतली आहे. यापूर्वी एन्‍रॉन, जैतापूर यांनाही त्यांनी विरोध केला होता. आता नाणारलाही आपला विरोध असल्याचे ते वरवर दाखवत आहेत. मात्र, वस्तुस्थिती वेगळी आहे.  

ग्रीन रिफायनरीमध्ये जे लोक आहेत ते शिवसेनेचे दलाल आहेत. असा दावा त्यांनी केला. उद्योगमंत्री हे शिवसेनेचे आहेत. जर या प्रकल्पाला शिवसेनेचा प्रामाणिक विरोध असेल तर उद्योगमंत्र्यांनीच तो प्रकल्प रद्द करावा. असे आव्हान त्यांनी केले.  ग्रीन रिफायनरीला आमचा विरोधच आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नाणारला जाऊन शिवसेनेचा खरा चेहरा समोर आणणार असल्याचा इशारा श्री. राणे यांनी दिला.

विकास निधीची आकडे जिल्हाधिकार्‍यांनी जाहीर करावेत 
पालकमंत्री दीपक केसरकर यांनी विकास काम रखडविण्यात राणेंचे छुपा हात असल्याच्या केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. राणे म्हणाले, जिल्ह्यात करोडो रुपयांचा विकास निधी आणला असे जर पालकमंत्री म्हणत असतील तर तो त्यांनी दाखवावा; नव्हे जिल्हाधिकार्‍यांनी जाहीरच करावे, असे आव्हान त्यांनी दिले. विकास कशाशी खातात हे  ना. केसरकर यांना माहित आहे का? असा सवाल त्यांनी केला.