Mon, Aug 10, 2020 05:21होमपेज › Konkan › माणगावचा तरुण अपघातात ठार

माणगावचा तरुण अपघातात ठार

Published On: Apr 19 2018 1:35AM | Last Updated: Apr 18 2018 9:57PMकुडाळ : वार्ताहर

मुंबई-गोवा महामार्गावर साळगाव सावित्रीलिला  मंगल कार्यालया नजीक मोटारसायकल व टँकर यांच्यात झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार व माणगाव येथील ओंकार ट्रेडर्सचे मालक ज्ञानेश्‍वर रामचंद्र ताम्हाणेकर (वय 48, रा. माणगाव नमसवाडी) हे जागीच ठार झाले. हा अपघात सायं. 5.15 वा.च्या सुमारास घडला. महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू झाल्यानंतर  तालुक्यातील अपघातातील हा चौथा बळी आहे.

ठेकेदाराकडून कामादरम्यान योग्य ती खबरदारी घेतली जात नसल्यानेच असे अपघात होत असल्याचा आरोप वाहनचालक व ग्रामस्थांमधून होत असून, चौपदरीकरण कामाच्या पद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्‍त होत आहे. मोटारसायकलस्वार ज्ञानेश्‍वर ताम्हाणेकर हे कामानिमित्त येथून कुडाळ येथे येत होते. तर टँकर कुडाळवरून गोव्याच्या दिशेने जात होता. साळगाव सावित्रीलीला  मंगल कार्यालयानजिक श्री. ताम्हाणेकर आले असता गोव्याच्या दिशेने जाणार्‍या एका फॉरच्युनर कारने  त्यांना हुल दिली. यावेळी ताम्हाणेकर यांची मोटारसायकल या कारला काही प्रमाणात घासली. यातून सावरून ते रस्त्यावर येत असताना  समोरून येणार्‍या टँकरला एका बाजूने धडक बसली.अशी माहिती घटनास्थळावरून मिळाली. यावेळी टँकर आपली बाजू सोडत काहीसा तिरप्या स्थितीत असल्याचे घटनास्थळी दिसून आले.  श्री. ताम्हाणेकर यांचे डोके कॅटरला जोरदार आदळल्याने  डोक्याला  गंभीर दुखापत झाली. त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्‍तस्त्राव झाला. या अपघातात मोटारसायकलच्या दर्शनी भागाचा चुराडा झाला.

याठिकाणी मोठ्या प्रमाणात दोन्ही बाजूला मातीचा भराव टाकण्यात आला आहे. यामुळे रस्त्याचा अंदाज वाहनचालकांना येत नाही. या भरावामुळे धुळही मोठ्या प्रमाणात उडते. यामुळे हा अपघात घडला असावा. अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती. ज्ञानेश्‍वर ताम्हाणेकर यांचे माणगांव तिठा येथे ओंकार ट्रेडर्स नावाचे हार्डवेअरचे दुकान असून ते माणगांव-नमसवाडी येथे राहतात. माजी जि.प. सदस्य रमाकांत ताम्हाणेकर यांचे ते चुलत भाऊ होत. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, वडील असा परिवार आहे. ज्ञानेश्‍वर ताम्हाणेकर यांचा मृतदेह सावंतवाडी येथे ठेवण्यात येणार असून गुरूवारी त्यांच्यावर मांणगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

घटनास्थळी कुडाळ पोलिस निरीक्षक श्री भोसले यांनी भेट दिली. यावेळी ग्रामस्थांनी श्री भोसले यांचे रस्त्याच्या कामादरम्यानच्या स्थितीकडे लक्ष वेधले. यावेळी श्री भोसले यांनी यासंदर्भात आपण लवकरच सबंधित एजन्सी, लोकप्रतिनीधी, ग्रामस्थ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांची संयुक्‍त बैठक घेवून याबाबत तोडगा काढण्याची ग्वाही दिली.