होमपेज › Konkan › ‘खवळ्यां’चा बंपर!

‘खवळ्यां’चा बंपर!

Published On: Sep 02 2018 1:13AM | Last Updated: Sep 01 2018 11:04PMमालवण  : प्रतिनिधी

काही दिवसांपूर्वी खवळलेला समुद्र शांत झाला असून नारळी पौर्णिमेनंतर पारंपरिक पद्धतीच्या रापणीच्या सहाय्याने मासेमारी सुरू झाली आहे. शनिवारी मालवण शहरातील धुरिवाडा येथील समुद्रात स्थानिक मच्छीमारांनी ओढलेल्या रापण जाळ्यात तब्बल दोन टन ‘खवळा’ माशांचा कॅच मिळाला आहे.

पावसाळा कालावधीनंतर पुन्हा एकदा येथील मच्छीमार मासेमारीसाठी सज्ज झाला आहे. 1 ऑगस्टपासून मासेमारी हंगाम सुरू झाल्यानंतर समुद्रातील मासेमारीला सुरुवात झाली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा निर्माण झालेल्या वादळी हवामानामुळे समुद्र पुन्हा एकदा खवळला होता. आता हवामानात बदल होऊन खर्‍या अर्थाने मासेमारी हंगाम सुरू झाला आहे. नारळी पौर्णिमेनंतर इतर प्रकारची मासेमारी सुरू झाली असतानाच पारंपरिक पद्धतीने रापणीच्या सहाय्याने करण्यात येणारी मासेमारी सुद्धा सुरू झाली आहे. शनिवारी मालवण शहरातील धुरिवाडा येथील समुद्रात स्थानिक मच्छीमारांनी ओढलेल्या रापण जाळ्यात ‘खवळा’ माशांचा तब्बल दोन टन  वजनाचा कॅच मिळाला आहे. बाजारपेठेमध्ये इतर माशांच्या तुलनेत ’खवळा’ माशांना कमी दर मिळतो. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात मिळालेल्या या माशांच करायचं काय असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र नाममात्र दरात का होईना हा मासा खरेदी करण्यासाठी व्यापारी पुढे आल्यामुळे येथील मच्छिमार काहीसा निश्‍चिंन्त झाला आहे.