Wed, Aug 12, 2020 09:06होमपेज › Konkan › राष्ट्रवादी जोमात तर शिवसेनेचे वेट अ‍ॅण्ड वॉच

राष्ट्रवादी जोमात तर शिवसेनेचे वेट अ‍ॅण्ड वॉच

Published On: Sep 27 2019 2:13AM | Last Updated: Sep 27 2019 2:13AM
चिपळून-संगमेश्वर : श्रीकृष्ण देवरुखकर

चिपळूण-संगमेश्‍वर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीकडून प्रचाराला सुरुवात झाली आहे. मात्र, शिवसेनेकडून अद्याप तशा हालचाली दिसत नसून, राष्ट्रवादी जोमात तर शिवसेनेचे वेट अ‍ॅण्ड वॉच सुरू आहे.

गत निवडणुकीमध्ये चिपळूण विधानसभा मतदार संघामध्ये आमदार सदानंद चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार शेखर निकम यांचा 6 हजार 68 मतांनी पराभव केला होता. मात्र, या पराभवानंतरही गेली पाच वर्षे शेखर निकम यांनी या मतदार संघामध्ये आपला जनसंपर्क कायम ठेवला आहे. आमदार सदानंद चव्हाण यांनीही या विधानसभा मतदार संघात विविध विकास कामे करत जनसंपर्क ठेवला. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांची उमेदवारी धोक्यात येऊ शकते, असे राजकीय वातावरण तयार केले जात आहे. त्यामुळे शिवसेनेमध्ये वेट अ‍ॅण्ड वॉच अशी स्थिती आहे.

या निवडणुकीमध्ये तिवरे येथील धरणफुटीचा मुद्दा कळीचा ठरणार आहे. या धरणाचे बांधकाम आमदार सदानंद चव्हाण यांच्या कन्स्ट्रक्शन कंपनीने केले आहे. दरम्यान, तिवरे धरण खेकड्यांनी फोडले असे मत जलसंधारण राज्यमंत्री तानाजी सावंत यांनी मांडल्याने तीव्र प्रतिक्रिया व्यक्‍त झाल्या. हा विषय सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल झाला होता. याचा फटका विद्यमान आमदारांना बसेल, असा होरा राजकीय वर्तुळात वर्तवला जात आहे. असे असले तरी आमदार सदानंद चव्हाण यांच्या समर्थकांनी मात्र चव्हाण यांनाच पुन्हा संधी मिळेल आणि ते निवडून येतील, असा विश्‍वास व्यक्‍त केला आहे.

शिवस्वराज्य यात्रेत खासदार अमोल कोल्हे यांनी चिपळुणात आल्यावर खेकड्यांची भीती वाटते, असा या धरणफुटीबाबत टोला लगावला होता. त्यामुळे या विधानसभा मतदार संघात हा कळीचा मुद्दा ठरेल, असे चित्र आहे. भाजप-शिवसेना युती न झाल्यास शिवसेनेला संघर्ष करावा लागणार आहे. विद्यमान आमदार  सदानंद चव्हाण यांना संधी न मिळाल्यास चिपळूण-संगमेश्‍वर विधानसभा मतदार संघामध्ये शिवसेनेमध्ये नुकतेच प्रवेश केलेले राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार भास्कर जाधव यांना या मतदार संघातून संधी दिली जाऊ शकते. त्यांचे चिरंजीव जि.प.सदस्य 
विक्रांत जाधव यांना गुहागर विधानसभा मतदार संघात संधी मिळण्याची शक्यता आहे. या विधानसभा मतदार संघातून माजी आमदार सुभाष बने हेही इच्छुक आहेत. त्यामुळे या विधानसभा मतदार संघात सेनेकडून कोणाची वर्णी लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपकडून चिपळूण नगरपरिषदेच्या सुरेखा खेराडे, माजी आमदार बाळ माने, उद्योजक तुषार खेतल यांच्या नावांचा विचार होऊ शकतो.

काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीकडून शेखर निकम यांचे नाव जवळजवळ निश्‍चित आहे. मात्र, या निवडणुकीमध्ये युती न झाल्यास शेखर निकम यांना ही निवडणूक सोपी होऊ शकते. याउलट शिवसेना व भाजप या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात विजयासाठी संघर्ष करावा लागणार आहे. त्यामुळे या विधानसभा मतदार संघातील शिवसेना नेत्यांमध्ये युतीच्या निर्णयाच्या स्पष्टतेबाबत घालमेल सुरू आहे. युती झाल्यास या विधानसभा मतदार संघात शिवसेनेचा संघर्ष कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्‍त होत आहे. सध्या तरी राष्ट्रवादीचा प्रचार सुरू झाला असून, शिवसेनेचे वेट अ‍ॅण्ड वॉच सुरू आहे.