सावंतवाडी ः वार्ताहर
सिंधुदुर्ग जिल्ह्यात यापुढे होणार्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविण्यात येतील. तसेच होऊ घातलेल्या सावंतवाडी नगराध्यक्ष निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार उभा करणार, असे माजी पालकमंत्री आ.दीपक केसरकर यांनी सांगितले.
डॉ. जयेंद्र परुळेकर, वसंत उर्फ अण्णा केसरकर आदी उपस्थित होते. विधानसभा निवडणूक निकालानंतर तब्बल एक महिन्याने आ. केसरकर यांनी सावंतवाडीत पत्रकारांशी संवाद साधला. राजकारणातील संवेदनशील, लोकांच्या प्रसंगाला धावून येणारा, शेतकर्यांच्या प्रश्नाला न्याय मिळवून देणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला ही आनंदाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
आरे व नाणार आंदोलकांवरील गुन्हे मुख्यमंत्र्यांनी मागे घेतले आहेत. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे महाराष्ट्राला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. येणार्या काळात सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तिन्ही पक्षातील वरिष्ठांच्या आदेशानुसार महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविल्या जातील. आपण या बाबत तिन्ही पक्षांचे जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्षांशी चर्चा करणार असल्याचे आ. केसरकर म्हणाले.
यापुढे जिल्हा परिषदमध्येही चांगला बदल होईल, असे सूचक वक्तव्यही केसरकर यांनी केले. जर कोणी पक्षांतर केले तर त्यांना व्हिप लागू होईल. जि. प. च्या काही सदस्यांनी बनविलेला गट नवीन नियमाप्रमाणे बेकायदेशीर असल्याचा दावा त्यांनी केला. त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई होईल, असे ते म्हणाले.
सावंतवाडी नगराध्यक्ष निवडणुकीबाबत विचारले असता आ. केसरकर म्हणाले, शहर विकासाच्या दृष्टीने निवडणूक ही बिनविरोध व्हावी, अशी आपली अपेक्षा आहे. मात्र महाविकास आघाडी एकत्रीत ही निवडणूक लढवेल. महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चितीसाठी आपण तिन्ही पक्षाच्या पदाधिकार्यांना विय्वासात घेणार असल्याचे ते म्हणाले. 3 डिसेंबर या जागतिक दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा आ. केसरकर यांनी दिव्यांग बाधवांना दिल्या.