Wed, Aug 12, 2020 09:17होमपेज › Konkan › कुवळे तलाठी लाच घेताना जाळ्यात

कुवळे तलाठी लाच घेताना जाळ्यात

Published On: May 17 2018 1:27AM | Last Updated: May 17 2018 1:05AMदेवगड : प्रतिनिधी

जमिनीच्या केसबाबत प्रांताधिकार्‍यांनी दिलेल्या निकालाप्रमाणे सात-बारा व फेरफारमध्ये नोंद घेण्यासाठी कुवळे येथील एका शेतकर्‍याकडून 1500 रुपयांची लाच घेताना सिंधुदुर्ग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कुवळे तलाठी मारुती सुबराव सलाम (वय 43) याला रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी दुपारी 1.20 वाजण्याचा सुमारास देवगड तहसील कार्यालयाच्या आवारात केली. 

कुवळे येथील शेतकर्‍याचा जमिनीच्या मालकी हक्‍काबाबत वारसांमध्ये वाद होता. या वादाबाबत मंडळ अधिकार्‍यांकडे दावा सुरू होता. यामध्ये तक्रारदार शेतकर्‍यांच्या विरुद्ध बाजूने निकाल लागल्यामुळे त्या शेतकर्‍यांनी प्रांताधिकार्‍यांकडे अपील केले. या अपिलामध्ये तक्रारदार शेतकर्‍यांच्या बाजूने निकाल लागला होता.

त्यानंतर प्रांताधिकार्‍यांनी दिलेल्या निकालाप्रमाणे सातबारा व फेरफारमध्ये नोंद घालावी,  अशी मागणी त्या शेतकर्‍यांनी कुवळे तलाठी यांच्याकडे केली होती. तलाठी मारूती सलाम यांनी नोंद घालण्यासाठी त्या शेतकर्‍याकडे 3 हजारांची मागणी केली म्हणून शेतकर्‍यांनी लाचलुचपत विभागाकडे संबंधित तलाठ्याविरोधात 14 मे रोजी तक्रार केली होती.त्या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक शंकर चिंदरकर व त्यांच्या सहकार्‍यांनी कुवळे व शिरगाव येथे पडताळणी केली व दीड हजार रूपयांची लाच घेताना तलाठी मारूती सलाम यास रंगेहाथ पकडले.

ही कारवाई लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक शंकर चिंदरकर व त्यांचे सहकारी पोलिस निरिक्षक मितीष केणी, पोलिस शिपाई महेश जळवी, पोलिस नाईक नीलेश परब, जितेंद्र पेडणेकर, महिला पोलिस नाईक कांचन प्रभू यांच्या टीमने केली.