Mon, Aug 10, 2020 05:19होमपेज › Konkan › कुडाळ-बांबुळी ग्रामसेवक निलंबित

कुडाळ-बांबुळी ग्रामसेवक निलंबित

Last Updated: Apr 07 2020 9:39PM
सिंधुदुर्गनगरी : पुढारी वृत्तसेवा
कुडाळ तालुक्यातील बांबुळी ग्रामपंचायतच्या चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीत मोठा घपला केल्याप्रकरणी ग्रामसेवक देवेंद्र कसालकर यांना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांनी निलंबित केले आहे. 

ग्रामसेवक कसालकर यांनी बांबुळी ग्रामपंचायतच्या चौदाव्या वित्त आयोगातील लाखो रुपयांचा निधी परस्पर हडप केला होता. त्याबाबत तक्रार झाल्यानंतर याची रितसर चौकशी करण्यात आली असून यात लाखोंनी रुपये ग्रामसेवकाने हडप केल्याचे निष्पन्न झाले होते. याबाबत गटविकास अधिकारी स्तरावरून प्राप्त झालेला चौकशी अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांच्याकडे कारवाईसाठी सादर करण्यात आला होता. या  कारवाईमुळे ग्रामसेवक व जि. प. कर्मचार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. 

बांबुळी ग्रामपंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोग निधीत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार करण्यात आली होती. त्या अनुषंगाने  चौकशी करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी कुडाळ गटविकास अधिकारी यांना दिले होते. कुडाळ गटविकास अधिकारी स्तरावर चौकशी पूर्ण करून त्याचा चौकशी अहवाल जिल्हा परिषदेला प्राप्त झाला होता. या चौकशी अहवालात बांबुळी ग्रामपंचायतच्या चौदाव्या वित्त आयोगातील निधी खर्चात अनियमितता आढळून आली आहे. जबाबदार व्यक्तींनी विकासकामांवर यातील निधी खर्च न करता परस्पर काढल्याचे स्पष्ट झाले होते.        

चौकशी अहवालात सरपंच कसे नाहीत ?
ग्रामपंचायतचा व्यवहार हा सरपंच व ग्रामसेवक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने चालतो. गटविकास अधिकारी स्तरावर करण्यात आलेल्या चौकशीत बांबुळी ग्रामसेवकावर या भ्रष्टाचाराची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. परंतु चौदाव्या वित्त आयोगातील निधी खर्चाचा धनादेश काढताना सरपंच व ग्रामसेवक यांची संयुक्त स्वाक्षरी आवश्यक असते. त्यामुळे या नियमाने ग्रामसेवक सोबत सरपंचसुद्धा तेवढेच जबाबदार आहेत. तरीही तालुकास्तरावर चौकशी करताना सरपंच यांचे नाव नाही कसे ? असा प्रश्न आहे. 

खाते सील करून पदभार दुसर्‍याकडे देण्याचे आदेश
जिल्हा परिषद स्तरावर गटविकास अधिकारी यांचा चौकशी अहवाल प्राप्त झाल्यावर त्यात अनियमितता आढळली होती. त्याचवेळी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने कुडाळ पंचायत समितीला आदेश देत बांबुळी ग्रामपंचायतचे चौदावा वित्त आयोग बँक खाते तात्काळ सील करण्याचे सांगितले आहे. मंगळवारी ग्रामसेवक कसालकर याला निलंबित केल्यानंतर ग्रामपंचायतची सर्व खाती सील करण्याचे तसेच येथील पदभार दुसर्‍या ग्राम सेवकाला देण्याचे आदेश डॉ. वसेकर यांनी दिले आहेत.