Sun, Aug 09, 2020 11:08होमपेज › Konkan › गणेशोत्सवात दिवा व सिंधुदुर्गातील  सर्व स्टेशनवर गाड्यांना थांबा द्या

गणेशोत्सवात दिवा व सिंधुदुर्गातील  सर्व स्टेशनवर गाड्यांना थांबा द्या

Published On: Aug 04 2018 10:55PM | Last Updated: Aug 04 2018 10:27PMकणकवली : प्रतिनिधी

गणपतीच्या काळात कोकणातून जाणार्‍या-येणार्‍या सर्व रेल्वे गाड्यांना ठाण्यातील दिवा,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी,कणकवली,कुडाळ, सावंतवाडी या स्टेशनवर थांबा द्यावा, अशी मागणी मनसे नेते माजी आ. परशुराम उपरकर यांनी कोकण रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 कोकणात गणपती उत्सव हा मोठ्या प्रमाणावर भक्तिभावाने घराघरात साजरा केला जातो. या उत्सवाकरीता मुंबई, महाराष्ट्राप्रमाणे जगाच्या कानाकोपर्‍यातून चतुर्थीला लोक आपल्या गावी घरी येतात. या गणपतीला येण्याकरीता सद्यस्थितीत मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने पूर्णत: खड्डेमय होवून रस्ता अपघातग्रस्त झाला आहे. त्यामुळे चाकरमान्यांकरीता मुंबईहून येणार्‍या व परतीकरीता सोडलेल्या जादा गाड्या व त्यापेक्षा अधिक गाड्या सोडून वेस्टर्न लाईनवरून विरार, बांद्रा या ठिकाणाहूनही गाड्या सोडण्यात याव्यात. 

कोकण रेल्वे प्रकल्पाकरीता कोकणी माणसाने मोठा त्याग केला आहे. अतिशय अल्प मोबदल्यात शेतकर्‍यांनी आपल्या जमिनी दिल्या आहेत. मात्र, तरीही बहुतांश प्रकल्पग्रस्तांना नोकर्‍या मिळालेल्या नाहीत. कोकणच्या योगदानामुळे गोव्याकडे जाण्यासाठी पूर्वीच्या लागणार्‍या वेळेपेक्षा 12 तास कमी झाले व केरळचाही प्रवास 24 तासाने कमी झाला असला तरी कोकणात ठराविक ट्रेन ठराविक स्टेशनवर थांबतात. मात्र, गोव्यानंतर कर्नाटक, केरळ राज्यात बहुतांशी तर 20 ते 25 मिनिटांच्या अंतरावर रेल्वेला थांबा देण्यात आला आहे. काही रेल्वेगाड्या अनेकवेळा क्रॉसींग करीता विविध स्टेशनवर थांबतात. मात्र, ज्या कोकणी माणसाने आपल्या जमिनी कोकणात रेल्वे आणण्यासाठी रेल्वे प्रकल्पाला दिल्या त्या कोकणी माणसासाठी गणपतीसारख्या मोठ्या सणाला जादा गाड्या सोडणे आवश्यक आहे. विशेषत: वेस्टर्न लाईन व सेंट्रल लाईनवरून या गाड्या सोडणे आवश्यक आहे. ठाणे स्टेशनवर गर्दी होत असल्याने डोंबवली, कळवा, दिवा, अंबरनाथ पर्यंत पसरलेल्या कोकणी माणसांना येताना-जाताना दिवा येथे थांबा दिल्यास या चाकरमान्यांची सोय होणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील कोकणी माणसाला त्याचा लाभ होणार आहे. तरी या मागणीकडे गांभिर्याने लक्ष देवून गणपतीच्या काळात कोकणातून येणार्‍या-जाणार्‍या सर्व गाड्यांना दिवा आणि सिंधुदुर्गातील सर्व स्टेशनवर थांबा द्यावा, अशी मागणी परशुराम उपरकर यांनी केली आहे.