Wed, Aug 12, 2020 09:21होमपेज › Konkan › बांधकाम कामगारांसाठी ‘अटल विश्‍वकर्मा’

बांधकाम कामगारांसाठी ‘अटल विश्‍वकर्मा’

Published On: Mar 03 2018 1:49AM | Last Updated: Mar 02 2018 9:32PMकणकवली : नितीन कदम 

पूर्वी माणसांच्या ‘रोटी, कपडा और मकान’ अशा तीन मूलभूत गरजा मानल्या गेल्या हेत्या. पण आता कालानुरुप ‘पढाई, दवाई और कमाई’ यासुध्दा तितक्याच महत्त्वाच्या गरजा बनल्या आहेत. या मूलभूत गरजांपासून नेहमीच वंचित रहाणार्‍या बांधकाम कामगारांचे जीवनमान उंचवावे या हेतूने महाराष्ट्र शासनाने इमारत बांधकाम कामगारांसाठी ‘अटल विश्‍वकर्मा योजना’ लागू केली आहे. या योजनेंतर्गत राज्य शासनाच्या विविध 28 कल्याणकारी उपक्रमांचा लाभ बांधकाम कामगारांना मिळणार आहे. 

या योजनांचा लाभ घेण्यासाठी इमारत बांधकाम कामगार हा नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. म्हणूनच राज्य शासनाने या वर्षी  25 लाख इमारत बांधकाम कामगार नोंदणीचे लक्ष्य ठेवले आहे.  23 फेब्रुवारी रोजी या विशेष नोंदणी अभियानाची सुरुवात झाली असून ती 23 मार्चपर्यंत सुरू रहाणार आहे. 

 या योजनेचा लाभ 18 ते 60 वर्षे वयोगटातील इमारत व इतर बांधकाम कामगारांना घेता येणार आहे. इमारत व इतर बांधकाम (रोजगार, नियमन व सेवाशर्ती) अधिनियमातील मूळ व्याख्येत समाविष्ट 21 प्रकाराचे बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणी करुन विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेऊ शकतात.  कामगार नोंदणी फी  25 रुपये इतकी असून दरमहा वर्गणी 1 रुपया आणि 60 रुपये पाच वर्षांसाठी आहे.

कामगार कुटुंबीयांसाठी जन आरोग्य योजना

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना या योजनेत समाविष्ट करण्याबरोबरच बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2 जून 2017 पासून लागू करण्यात आली आहे.