Sun, Aug 09, 2020 12:07होमपेज › Konkan › कोण होणार कणकवलीचा उपनगराध्यक्ष?

कोण होणार कणकवलीचा उपनगराध्यक्ष?

Published On: Apr 17 2018 10:41PM | Last Updated: Apr 17 2018 10:41PMकणकवली : प्रतिनिधी

कणकवली नगरपंचायतीवर स्वाभिमान-राष्ट्रवादी आघाडीने एक हाती सत्ता स्थापन केल्यानंतर आता कणकवलीच्या उपनगराध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता कणकवलीवासीयांसह राजकीय वर्तुळात आहे. उपनगराध्यक्षपदासाठी स्वाभिमानचे ज्येष्ठ नगरसेवक बंडू हर्णे, अभिजीत मुसळे, रवींद्र उर्फ बाबू गायकवाड आणि स्वाभिमानला खंबीरपणे साथ देणारे राष्ट्रवादीचे एकमेव नगरसेवक अबिद नाईक या चौघांची नावे चर्चेत आहेत. मात्र अंतिम निर्णय हा खा.नारायण राणे हेच घेणार आहेत. दरम्यान नवनिर्वाचीत नगराध्यक्ष आणि नगरसेवकांची नावे गॅझेटमध्ये प्रसिध्द झाल्यानंतरच नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली उपगनराध्यक्ष पदाच्या निवडीची बैठक होणार आहे.

कणकवली नगरपंचायतीच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत अखेर स्वाभिमानने बाजी मारत नगराध्यक्षपदासह एक हाती सत्ता प्रस्थापित केली. नगराध्यक्षपदी स्वाभिमानचे समीर नलावडे हे विजयी झाले आहेत. स्वाभिमानने नगरसेवक पदाच्या 10 जागा जिंकल्या असून एक जागा राष्ट्रवादीच्या खात्यात आहे. शिवसेना-भाजपला मात्र प्रत्येकी तीन जागांवर समाधान मानावे लागले. आता कणकवलीचे नवे कारभारी नगरपंचायतीची कधी हाती घेणार याची उत्सुकता सार्‍यांनाच आहे. याबाबत मुख्याधिकारी अवधुत तावडे म्हणाले, नवनिर्वाचीत नगराध्यक्ष आणि नगरसेवकांची नावे राज्य शासनाच्या गॅझेटमध्ये येत्या दोन तीन दिवसात प्रसिध्द होतील. गॅझेटमध्ये प्रसिध्द झाल्यानंतर 25 दिवसांच्या आतमध्ये सभा आयोजित करावी लागते. त्यानुसार ही सभा या महिन्याच्या अखेरीस किंवा पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. या सभेत नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली उपनगराध्यक्षांची निवड होणार आहे. त्यामुळे आता या उपनगराध्यक्षपदी कुणाची वर्णी लागते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

स्वाभिमानच्या सर्व विजयी उमेदवारांमध्ये गणेश उर्फ बंडू हर्णे हे ज्येष्ठ नगरसेवक असून मागील दोन टर्ममध्ये त्यांना ही संधी हुकली होती. आताही अटीतटीच्या लढतीत ते केवळ दोन मतांनी विजयी झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाचा विचार होवू शकतो. तर अभिजीत मुसळे यांनाही संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यांनीही प्रभाग 3 मधून जोरदार मुसंडी मारत विजय मिळविला आहे. विशेष म्हणजे रवींद्र उर्फ बाबू गायकवाड यांच्याही नावाचा मराठा कार्ड म्हणून विचार होवू शकतो. त्याचबरोबर स्वाभिमानला साथ देणारे राष्ट्रवादीचे नगरसेवक अबिद नाईक यांच्याही नावाची चर्चा आहे. राष्ट्रवादीने स्वाभिमानशी आघाडी करताना केवळ एकच उमेदवार दिला होता. त्यामुळे अबिद नाईक यांच्या रूपाने आघाडीचा धर्म पाळला जावू शकतो. मात्र अंतिम निर्णय हा खा. नारायण राणे आणि आ. नितेश राणे हेच घेणार आहेत. हे चित्र येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे. 

कालच शिवसेना-भाजपने आपला गट स्थापन करून गटनेतेपदी शिवसेनेच्या सुशांत नाईक यांची निवड केली आहे. त्यामुळे आता स्विकृत नगरसेवक म्हणून सेना-भाजपतर्फे कुणाला संधी मिळते याकडे लक्ष लागले आहे.  अर्थात शिवसेनेची भुमिका काय असेल यावरच हे अवलंबून आहे. सेना आणि भाजप या दोन्ही पक्षांचे समसमान संख्याबळ असल्याने दोन्ही पक्षांचे नगरसेवक समजूतदारपणा दाखवून सभागृहात सक्षम विरोधकाची भुमिका कितपत पार पाडतात हेही पुढील काळात स्पष्ट होणार आहे.