Wed, Aug 12, 2020 11:32होमपेज › Konkan › जि.प.ची अविश्वासाची सभा वादात

जि.प.ची अविश्वासाची सभा वादात

Last Updated: Nov 02 2019 10:15PM
रत्नागिरी : प्रतिनिधी

जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांची अविश्वास ठरावापूर्वी बदली झाली असली तरी अजूनही अविश्वास सभेवरून धुसफूस सुरूच आहे. 30 सप्टेंबरला रद्द झालेली अविश्वास ठरावाची सभा अनेक कारणांनी वादात सापडली आहे. या वादाची ठिणगी 5 नोव्हेंबरच्या सर्वसाधारण सभेत पडण्याची शक्यता आहे.

जिल्हा परिषदेमध्ये सध्या पदाधिकारी, अधिकारी व सदस्य यांच्यातील सुरू असलेल्या संवादावरून ‘घडलंय बिघडलंय’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या प्रकारामुळे जि. प.तील वातावरण ढवळून निघाले आहे. गेल्या काही सभांमध्ये हे स्पष्टपणे दिसून आले होते. यातूनच मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांच्या विरोधातील अविश्वास ठरावाचं नाट्य रंगात आलं. मात्र शुक्रवारी मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांची बदली झाल्याने या अविश्वास ठरावाच्या नाट्यावर पडदा पडला.

अविश्वास ठरावापूर्वीच मुख्य कार्यकारी अधिकारी यांची बदली झाल्याने अविश्वास ठरावाचा विषय संपला आहे असे वाटत असले तरी अविश्वासाच्या सभेवरून सध्या धुसफूस सुरू आहे. 30 सप्टेंबरच्या अविश्वास ठरावासाठी जि.प. अध्यक्षांनी नियमानुसार सभा बोलावली होती. मात्र प्रशासनाने जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांच्या पत्राचा आधार घेत ही सभा रद्द केली होती. मुळात पदाधिकारी व सदस्यांच्या म्हणण्यानुसार सभा रद्द करता येत नाही. त्यामधील अविश्वास ठराव किंवा धोरणात्मक निर्णय होऊ शकत नाही. सभा कोणत्या नियमानुसार रद्द केली असा सवाल पदाधिकार्‍यांनी उपस्थित केला.

ही सभा रद्द केली असली तरी इतिवृत्त होणे गरजेचे होते. मात्र तसे काहीच केले गेले नाही. ना इतिवृत्त लिहिले, ना चर्चा केली. यामुळे 30 सप्टेंबरची सभा वादात सापडली. 5 नोव्हेंबरला सर्वसाधारण सभा व अविश्वास ठरावासाठी सभा आयोजित केली होती. आता मात्र बदली झाल्याने अविश्वास ठरावाचा विषय या सभेत घेता येणार नाही. असे असले तरी सर्वसाधारण सभेत मात्र मागील सभेवरून वाद होण्याची शक्यता आहे. प्रशासनाला पदाधिकारी कोंडीत पकडणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे ही सभा गाजणार हे निश्चित आहे.

या सर्वसाधारण सभेत मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना पाठिंबा देणार्‍या काही कर्मचार्‍यांचा विषयही होण्याची शक्यता आहे. जि.प. सदस्यांना मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांवर अविश्वास ठराव दाखल करण्याचा हक्क आहे. जिल्हा परिषद अधिनियम 1961 मधील कलम 94 (3) नुसार हा अविश्वास टाकला जाऊ शकतो. असे असतानाही कर्मचार्‍यांनी हस्तक्षेप केल्याचा समज पदाधिकार्‍यांचा आहे. यामुळे मंगळवारच्या सभेत हा विषयही गाजण्याची शक्यता आहे.