Sat, Aug 08, 2020 03:04होमपेज › Konkan › खड्ड्यांवरुन राष्ट्रीय महामार्ग विभाग धारेवर

खड्ड्यांवरुन राष्ट्रीय महामार्ग विभाग धारेवर

Published On: Aug 24 2018 10:35PM | Last Updated: Aug 24 2018 10:35PMचिपळूण : खास प्रतिनिधी

मुंबई-गोवा महामार्ग आणि चिपळूण-कराड रस्त्यावरील खड्ड्यांचे साम्राज्य, तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था, जलयुक्त शिवार योजना राबवूनही टंचाईच्या काळात पुरविण्यात आलेले टँकर, घर बांधणीच्या मंजुरीसाठी ग्रा.पं.ला नाकारण्यात आलेला अधिकार या मुद्यांवरुन पंचायत समितीच्या आमसभेत विविध प्रश्‍न उपस्थित झाले. शिवाय चिपळूणच्या सांस्कृतिक नगरीमध्ये शांतता बिघडविण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवत शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांचा निषेधाचा ठराव देखील मांडण्यात आला.

कापसाळ येथील माटे सभागृहात आ. सदानंद चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी आमसभा झाली. यावेळी सभापती पूजा निकम, उपसभापती शरद शिगवण, तहसीलदार जीवन देसाई, गटविकास अधिकारी सरिता पवार, जि. प.चे बांधकाम सभापती विनोद झगडे, मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेशदादा जाधव यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. सुरुवातीला तालुक्यातील गुणवान विद्यार्थी, आदर्श शेतकरी, स्वच्छता अभियान, ग्रामसमृद्धी योजना, तसेच आदर्श अंगणवाडी सेविका, मदतनीस, शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, कर्तव्यदक्ष अधिकारी, कर्मचारी, तहसीलदार जीवन देसाई आदींचा सत्कार करण्यात आला. आमसभेच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन गौरव झाला. या सभेत दिल्ली येथे संविधान जाळल्याप्रकरणी सुभाष जाधव यांनी निषेधाचा ठराव मांडला, तर महेंद्र कदम यांनी चिपळुणातील कायदा व सुव्यवस्था बिघडवल्याप्रकरणी, सामाजिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न केल्याने भिडे गुरुजी यांच्या निषेधाचा ठराव मांडला. 

यावेळी नगरसेवक अविनाश केळसकर यांनी, 45 लाखांचा मागासवर्गीय वस्तीसाठी असलेला निधी खर्ची न घातल्याचा मुद्दा याहीवर्षी उपस्थित केला. यावेळी आ. चव्हाण यांनी या योजनेसाठी आवश्यक अंदाजपत्रक तयार झाले असल्याचे सांगितले. तालुक्यात ठिकठिकाणी तलाठी उपलब्ध नाहीत. यावर तहसीलदार देसाई यांनी येत्या दोन महिन्यांत सर्वत्र तलाठी उपलब्ध होतील. सातबारा संगणकीकरणाचे काम 92 टक्के पूर्ण झाले आहे. तालुक्यात 2 लाख 69 हजार सातबारा आहेत. 167 गावांमध्ये ते विभागले असून उर्वरित सात टक्के काम दोन महिन्यांत पूर्ण होईल, असे सांगितले. यावेळी तालुक्यातील ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकार्‍यांना धारेवर धरले. उपअभियंता विजय पवार यांनी गुहागर-विजापूर मार्गाच्या रूंदीकरणाबाबत माहिती देताना सांगितले की, या मार्गासाठी 93.80 टक्के जागा शासकीय मालकीची आहे. केवळ सात टक्के जागा भूसंपादन करणे गरजचे असून संयुक्त मोजणीनंतर नेमकी कोणती जागा रस्त्यासाठी गरजेची आहे ते ठरेल व त्याचा मोबदला देण्यात येईल. 

महामार्गावरील खड्ड्यांबाबत आ. चव्हाण यांनी, 5 सप्टेंबरपूर्वी खड्डे भरावेत, अशा सूचना केल्या. तळसर येथील विजय साळुंखे यांनी रखडलेली पाणी योजना सुरू झाली आहे. मात्र, ग्रा.पं.चे रेकॉर्ड सील करण्यात आल्याचा मुद्दा मांडला. तालुक्यात ‘एमआरजीएस’ योजनेच्या माध्यमातून रस्त्याचे काम घेण्यात येत नाही. त्यासाठी तांत्रिक अधिकारी नाहीत, असे सांगून सर्व कामे ठप्प आहेत. या बाबत महेंद्र कदम यांनी मुद्दा उपस्थित केला. यावर गटविकास अधिकारी सरिता पवार यांनी अशा कामांची यादी देते, असे सांगितले.

घराखालील जमीन नावावर होण्याबाबत शासन कोणताच निर्णय घेत नाही. चिपळूण तालुक्यात 830 प्रकरणे जिल्हाधिकारी यांच्याकडे गेली आहेत. याबाबत निर्णय झालेला नाही. या संदर्भात तहसीलदारांना प्रश्‍न विचारण्यात आला. याबाबत शासन लवकरच निर्णय घेईल, असे आश्‍वासन त्यांनी दिले. ग्रा.पं.ना घरबांधणी परवानगीचा अधिकार द्यावा या प्रश्‍नावर आ. चव्हाण यांनी, येत्या काही दिवसांत असा अध्यादेश निघेल. मात्र, मोठ्या ग्रा.पं.ना हा अधिकार देण्यात येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. कामथे धरणातील गाळ काढावा, अशी मागणी उपसरपंच प्रदीप उदेग यांनी केली. किशोर कदम यांनी, एस.टी. बस वेळेत धावत नाहीत. गाड्यांना फलकही नाहीत. तसेच ध्वनीक्षेपकावर सूचना सांगितल्या जात नसल्याचा मुद्दा मांडला. चिपळूण बसस्थानकाचे काम गणेशोत्सवानंतर सुरू होणार आहे. त्यामुळे वर्षभर प्रवाशांनी सहकायर्र् करावे, असे आवाहन करण्यात आले. तालुक्यात गांग्रई, नांदिवसे, ओवळी, कापरे या ठिकाणी नव्या धरणांना मंजुरी मिळाल्याचे आ. चव्हाण यांनी सांगितले. अनारी-सती रस्त्याच्या दुरवस्थेबाबत विजय कदम यांनी मुद्दा उपस्थित केला. यावेळी कात्रोळी गाडी वेळेत सोडण्यात येत नाही. या शिवाय ग्रामीण भागातील अनेक प्रश्‍न उपस्थित झाले. ‘महावितरण’ने वीज बिलात केलेली वाढ, वीज बिल वितरणातील अनियमतता या बाबत मुद्दे उपस्थित झाले. या आमसभेत संजय जाबरे, विजय साळुंखे, घाग, सरपंच प्रवीण पाकळे आदींनी अनेक प्रश्‍न उपस्थित केले.

यावेळी आमसभेच्या समारोपात आ. सदानंद चव्हाण म्हणाले, तालुक्याच्या विकासाला आपण न्याय देत आहोत. जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. प्रास्ताविक सभापती पूजा निकम यांनी केले.