Wed, Aug 12, 2020 10:00होमपेज › Konkan › मला का अटक केले हे कळलेच नाही : छगन भुजबळ

घोषणाबाजीला आता जनता कंटाळली : छगन भुजबळ

Published On: Jan 12 2019 1:32AM | Last Updated: Jan 12 2019 12:11AM
शृंगारतळी : वार्ताहर

शिवसेना नदीकाठावर आरती करत प्रचाराची सुरुवात करीत आहे तर भाजप राम मंदिराचा राग आळवत लोकांच्या भावनेला हात घालत आहे. मोदी आणि फडणवीस यांच्या घोषणांना सर्व जनता कंटाळली असून आता देशात आणि राज्यात परिवर्तनाची लाट येणार आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँगे्रसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केले.

राष्ट्रवादी काँगे्रसतर्फे निर्धार परिवर्तन यात्रेची राज्यातली दुसरी सभा गुहागर विधानसभा मतदारसंघातील चिखली येथे गुरुवारी  (दि. 10) सायंकाळी झाली. या सभेला व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सुनील तटकरे व आ. भास्कर जाधव, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव व मतदारसंघातील सर्व  प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी छगन भुजबळ पुढे म्हणाले की, जातीय धर्मांधपणा हा पराकोटीचा वाढला आहे. गोमांस भक्षण केल्याच्या संशयातून पोलिस अधिकारी व नागरिकांना जीवे मारले जात आहे. अल्पसंख्याकांच्या विरोधात नाहक राळ उठविली जात असून देशामध्ये त्यांना असुरक्षित वाटत आहे. भारतीय स्वातंत्र्यात मोलाची कामगिरी बजावणार्‍या मुस्लिम समुदायाला तुच्छ लेखले जात आहे. तथाकथित धर्मरक्षणवाल्यांना अभय व विरोधी सूर काढणार्‍याचा आवाज बंद केला जात आहे. साहित्य संमेलनाला येणार्‍या ज्येष्ठ साहित्यिक नयनतारा सहगल यांचा आवाज बंद करण्यासाठी त्यांचे निमंत्रण रद्द केले गेले. हे फुले, शाहू, आंबेडकरांचा वारसा सांगणार्‍या महाराष्ट्राला लाजिरवाणे असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना भुजबळ म्हणाले, मोदी  स्वतःला चहावाले म्हणतात पण मी देखील भाजी विकण्याचे काम केले आहे. 

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले गेली साडेचार वर्ष तरूणाई, महिला पुरूष व देशाची सपशेल फसवणूक करण्याचे काम भाजप सरकारने केले आहे. रात्री झोपताना आज दिवसभर सरकारने माझी किती लूट केली याचा हिशेब लावत झोपी जाण्याचे दिवस आले आहेत. देशातील सर्व समाजघटकांचा भ्रमनिरास झाला असून हे सरकार जाणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असे मुंडे म्हणाले. 

या सभेत सुनिल तटकरे, जयंत पाटील व अजित पवार यांनी ही आपली मनोगते व्यक्त केली. रत्नागिरी जिल्ह्याची दोन्ही निवडणुकांची जबाबदारी गुहागरचे आ. भास्कर जाधव यांच्यावर टाकल्याचे सर्व वक्त्यांनी जाहीर केले. आ. भास्कर जाधव ही जबाबदारी परिपूर्ण रितीने निभावतील, असा विश्‍वासही व्यक्त केला. आ. जाधव यांनी आपल्या भाषणात 2004 पासून हा जिल्हा परिवर्तनाच्या प्रतीक्षेत आहे असे सांगितले. यावेळी हे परिवर्तन 100 टक्के शक्य आहे, असे स्पष्ट केले.

यावेळी राष्ट्रवादीचे राज्य, जिल्हा, तालुका स्तरावरील पदाधिकारी उपस्थित होते. कार्यकर्त्यांचीही उपस्थिती या कार्यक्रमाला होती. आगामी काळात निवडणुका जिंकायच्याच, असा निर्धार यावेळी करण्यात आला.

मला का अटक केले हे कळलेच नाही

अडीच वर्ष मी जेलमध्ये होतो. मला का पकडले? ते मलाच कळले  नाही व पकडणार्‍यालाही कळले नाही, असे छगन भुजबळ यावेळी म्हणाले. महाराष्ट्र सदनामध्ये भ्रष्टाचाराचा आकडा सदनाच्या किमतीपेक्षाही जास्त सांगितला गेला. हे सदन इतके सुंदर तयार केले गेले आहे की सगळे राजकारणी त्याचे कौतुक करतात. पण ‘महाराष्ट्र सदन सुंदर व बनालेवाला अंदर’ अशी कोटी भुजबळ यांनी यावेळी केली.