होमपेज › Konkan › ‘शिवीगाळमुक्‍त देवरूख अभियान’ राबवणार : भागवत

‘शिवीगाळमुक्‍त देवरूख अभियान’ राबवणार : भागवत

Published On: Mar 10 2018 11:01PM | Last Updated: Mar 10 2018 8:20PMदेवरुख : प्रतिनिधी

जागतिक महिलादिनी देवरूखमध्ये ‘शिवीगाळ मुक्‍त देवरूख अभियान’ राबवण्याचा संकल्प करण्यात आला. देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत यांनी ही संकल्पना मांडली.

देवरूख परिसरातील घराघरात जाऊन महाविद्यालयीन युवती या अभियानाची माहिती देणार आहेत.आपला मुलगा, मुलगी समाजात वावरताना त्याने शिवी देऊ नये यासाठी पालकांनी जागरूकता दाखवून हे अभियान यशस्वी करावे, असेही भागवत यांनी स्पष्ट केले.

जागतिक महिला दिनानिमित्ताने स्त्रीशक्‍तीबाबत आजच्या स्त्रीच्या भरारीबद्दल आणि त्यागाबद्दल चर्चा केली जाते. स्त्रीला समाजात मानाचे स्थान प्राप्त असले तरी शिव्यांमुळे स्त्रीचा आत्मसन्मान दुखावला जात आहे. हल्ली आई, बहिणीवरून शिवीगाळ करण्याचे प्रमाण वाढले आहे. कॉलेजजीवनातही काही मुले, मुली शिवीगाळ करत असून ही खेदाची बाब असल्याचे भागवत म्हणाले.

याबाबत देवरूख महाविद्यालय आता जनजागृती मोहीम राबवणार असून युवती घरोघरी जाऊन कोणीही शिवीगाळ करू नका, असे आवाहन करणार आहेत. या मोहिमेसाठी घोषणाफलक, भित्तीपत्रके यांचा वापर केला जाणार आहे.