Tue, Jan 19, 2021 22:46होमपेज › Konkan › आचरावासियांची गावपळण; निसर्गाच्या सानिध्यात थाटला संसार (video)

आचरावासियांची गावपळण; निसर्गाच्या सानिध्यात थाटला संसार (video)

Last Updated: Dec 13 2019 5:54PM
आचरा : उदय बापर्डेकर

एकमेकाला खेटून उभ्या राहिलेल्या.....झावळाच्या झोपड्या,....झोपड्यामधूनचं एकमेकांसोबत राहिलेला मुक्त संवाद... झोपडीतील जेवणाचा खमंग सुवास.....आणि लहानग्यांच्या किलबिलाटाने आचरा गावच्या गावपळणीचा पहिला दिवस उजाडला

रात्री चंद्राच्या प्रकाशात गप्पाचे फंड रंगले होते. गावपळणीच्या निमित्ताने दैनंदिन जीवनक्रमातून मुक्त होत आचरावासीय नैसर्गिक पध्दतीने राहण्याचा अनोखा आनंद अनुभवत आहेत. 

सध्याच्या धकाधकीच्या आणि मानसिक ताण तणावयुक्त जीवनात काही क्षण विरंगुळा मिळावा म्हणून मनुष्य प्राणी पंधरवढ्यातून वीकेंडची सुट्टी शोधून आनंदाचे क्षण अनुभवण्यासाठी फिरत असतो. आयटी क्षेत्रातील काम करणारे लोक तर आवर्जून अशा क्षणाची वाट पाहत असतात. ग्रामीण भागात कायम चूल आणि मूल सांभाळणारी स्री सुद्धा दैनंदिन रहाटगाडा सोडून गावपळणीची वाट पाहत असते.

गुरुवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास तोफांच्या आवाजानंतर सर्व ग्रामस्थांनी गाव सोडले. आचरेवासीय सीमेबाहेर स्थिरावले आहेत. पारवाडीच्या सीमेपलीकडे चिंदर सडेवाडीच्या माळरानावर, त्रिंबक, भगवंतगड रोडवर तर काहींनी आडबंरच्या डोंगरावर आपले संसार थाटले आहेत.

'घरचा पुढचा दार झाडूचा आसा मागच्या दारात खुप पतेरो साठलो असा बाळ्याक शाळेत पोचूक उशीर होता. बायचो डबो करूंक आजून सवड गावली नाया सकाळी १० वाजले तरी आजून खायचाचं काम झाला नाय असे बोलणे होत ना कसली कामाची कटकट ना कसली धावपळ सगळा कसा आरामात आणि आरामात.

शालेय विद्यार्थ्यांसाठी ना शाळेचे टेन्शन, ना क्लासची भुणभुण असे गोष्टीतील जीवन अनुभवायला मिळत आहे. आधुनिकतेच्या तालावर चालणाऱ्या युवा वर्गाकडूनही सर्व बाजूला ठेवून सहजीवनाचा मनमुरादपणे आनंद घेण्याकडे कल दिसून येत आहे. 

सकाळच्या थंडीतही युवावर्गाने थेट नदीपात्र गाठत आंघोळीसाठी गर्दी केली होती. काहीजण मासेमारीला गेले होते. तर आता घरे लगतच असल्याने महिला वर्ग बसल्या जागेवरून गप्पांचे फंड रंगवताना दिसत होते. सर्वांनी दुपारी तिखट जेवणाने गावपळणीची पहिली रात्र जागविली. रंगलेल्या गप्पाच्या शेजारपणाचे नाते अधिक घट्ट झालेच, शिवाय विचारांची देवाणघेवाणही झाली.

इलेक्ट्रॉनिक साधने आणि मनोरंजनाची साधने घराघरात पोहोचली असताना सीमेबाहेर असणारी माणसे मात्र या विजेविनाच जीवन जगत आहेत. मात्र त्यात कुणाची कुरबुर नाही की अडचण नाही. काही नासण्यातच त्‍यांना  आनंद गवसतो आहे. मोकळ्या वातावरणात निसर्गाशी थेट संवाद साधण्याचा निसर्गाशी एकरूप होण्याचा आनंद आचरेवासीय मिळवत आहेत.

रात्री महिलांनी फुगड्याचे फेर धरले होते, तर किशोरवयीन मुली रासदांडियाच्या तालावर थिरकत होते. कबड्डी, लगोरी, सापशिडी, पत्ते, आबाधुबी असे खेळ बहरत आले असून, झोपड्यांमध्ये एकमेकांनी केलेल्या खाद्यपदार्थांची देवाणघेवाण चालू असून निसर्गाच्या मोकळ्या वातावरणात आचरेवासीय एकरूप झाले आहेत. या अनोख्या प्रथेच्या माध्यमातून आचरेवासीय एक वेगळा अनुभव आपल्या गाठिशी साठवून ठेवत आहेत.  

गावपळणीच्या निमित्ताने संपूर्ण गाव जवळपास निर्मनुष्य झाले असून, केवळ किरकोळ वाहने रस्त्यावरन फिरत आहेत. गावातील शाळा, महाविद्यालय, पोस्ट ऑफिस, शासकीय कार्यालये बंद आहेत. अनेक वाड्यामध्ये दररोजची असणारी भांडणे विसरून शेजारी पाजारी या निमित्ताने एकत्र आले असून, ते आपल्या विचाराची देवाण घेवाण करत आहेत. गावपळणीमुळे सर्व गाव एका कुटुंबाप्रमाणे राहत असल्‍याचे चित्र दिसत आहे. 

आचऱ्याचा इनामदार श्री देव रामेश्वर हा आपला लोककल्याणकारी राजा असल्याची नितांत श्रद्धा आचरा ग्रामवासीयांची आहे. त्यामुळे श्रद्धेने ही परंपरागत गावपळण उत्साहपूर्ण वातावरणात आणि शांततेत सुरू आहे.