Mon, Aug 03, 2020 14:57होमपेज › Konkan › जि. प. विषय समिती सभापती निवडणूक बिनविरोध

जि. प. विषय समिती सभापती निवडणूक बिनविरोध

Last Updated: Jan 14 2020 11:01PM
रत्नागिरी : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी अपेक्षेप्रमाणे बिनविरोध पार पडली. बांधकाम व आरोग्य सभापतिपदी महेश ऊर्फ बाबू म्हाप, शिक्षण व अर्थ सभापतिपदी सुनील मोरे, महिला व बालकल्याण सभापतिपदी रजनी चिंगळे, तर समाजकल्याण सभापतिपदी ऋतुजा जाधव यांची निवड झाली.

गेल्या वेळेला अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक पार पडली होती. यानंतर आता विषय समिती सभापतींची निवडणूक जि.प.च्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात मंगळवारी पार पडली. चार सभापतिंसाठी ही निवडणूक होती. यासाठी शिवसेनेकडून प्रत्येकी  एका पदासाठी एकच अर्ज दाखल झाला. दुपारी बारा वाजता महेश म्हाप, सुनील मोरे, ऋतुजा जाधव, रजनी चिंगळे हे चार अर्ज दाखल झाले. तत्पूर्वी, सेेनेची पार्टी मिटिंग जि. प. अध्यक्षांच्या टीआरपी येथील शासकीय निवासस्थानी पार पडली. यावेळी सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, जि. प. अध्यक्ष रोहन बने, तसेच सर्व सेनेचे सर्व सदस्य उपस्थित होते. या बैठकीत मातोश्रीवरून आलेला लखोटा उघडण्यात आला. यामध्ये शिक्षण व अर्थ सभापती-सुनील मोरे (खेड), बांधकाम व आरोग्य सभापती-महेश ऊर्फ बाबू म्हाप (रत्नागिरी), समाजकल्याण सभापती-ऋतुजा जाधव (रत्नागिरी), महिला व बालकल्याण सभापती-रजनी चिंगळे (साखरपा) ही नावे जाहीर करण्यात आली.

चार पदांसाठी चारच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी विकास सूर्यवंशी यांनी दुपारी 3.20 वाजता ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. तसेच चारही जणांची नावे जाहीर केली. दुपारी 3.30 वाजता या सभापतींना खातेवाटप करण्यासाठी विशेष सभा पार पडली. यावेळी अध्यक्ष रोहन बने यांनी खातेवाटप जाहीर केले. यानुसार उपाध्यक्ष महेश नाटेकर यांना कृषी व पशुसंवर्धन, सुनील मोरे यांना शिक्षण, अर्थ, क्रीडा, तर बाबू म्हाप यांना बांधकाम, आरोग्य, ऋतुजा जाधव यांना समाजकल्याण, रजनी चिंगळे यांना महिला व बालकल्याण असे वाटप केले.