Wed, Aug 12, 2020 20:18होमपेज › Konkan › ‘प्लास्टिकमुक्‍त’ अभियानातही महिलांचा असाच सहभाग हवा!

‘प्लास्टिकमुक्‍त’ अभियानातही महिलांचा असाच सहभाग हवा!

Published On: Mar 07 2018 10:43PM | Last Updated: Mar 07 2018 8:33PMकुडाळ : शहर वार्ताहर

शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेवून  महिलांनी आर्थिक सक्षम  बनावे. प्लास्टिकमुक्‍त अभियानातही महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा, असे  आवाहन  जि.प. अध्यक्षा सौ. रेश्मा सावंत यांनी  महिला मेळाव्यात केले. या मेळाव्याला तालुक्यातील महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कुडाळ पंचायत समितीच्या वतीने आयोजित ‘अशी-कशी-तशी मी’ हा महिलांचा हितगूज कार्यक्रम अर्थात महिला मेळावा बुधवारी  येथील महालक्ष्मी हॉलमध्ये  पार पडला. या मेळाव्याचे  उद्घाटन जि. प.  अध्यक्षा सौ. रेश्मा सावंत यांच्या  हस्ते करण्यात आले. जि.प. महिला व बालकल्याण सभापती सौ. सायली सावंत, समाजकल्याण सभापती सौ. शारदा  कांबळे,  कुडाळ पं.स.चे  सभापती राजन जाधव, उपसभापती सौ. श्रेया परब, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, जि.प. सदस्या वर्षा कुडाळकर, पं.स. सदस्य डॉ. सुबोध माधव, मिलिंद नाईक,  जयभारत पालव, सौ. स्वप्ना वारंग, सौ. नूतन आईर, सौ. प्राजक्‍ता प्रभू, सौ. मथुरा  राऊळ, सौ. शीतल  कल्याणकर, सहायक गटविकास अधिकारी मोहन भोई, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संदेश कांबळे, नारूर सरपंच सौ. अलका  पवार, जिल्हा उमेद  अभियान कक्षाचे व्यवस्थापक प्रभाकर गावडे,  प्रसाद कांबळे, बालविकास प्रकल्प  अधिकारी सौ. सारा गायकवाड आदीसह सुमारे 700 हून अधिक  महिला उपस्थित होत्या.

सौ. सायली सावंत यांनी महिलांनी अन्यायाविरूध्द लढा द्यावा तसेच एकजुट दाखवावी असे आवाहन केले. सौ. कांबळे यांनी सावित्रीबाई  फुलेंचे विचार सर्वांनी आचरणात आणून एखाद्या स्त्रीवर  अन्याय होत असेल तर तिला सर्वांनी साथ द्यावी असे आवाहन केले. सभापती श्री. जाधव यांनी कुडाळ पं.स. विविध उपक्रम राबवत  असते.  महिला मेळावा हाही यातील एक उपक्रम आहे असे सांगत महिलांच्या उपस्थितीचे कौतुक केले.

नारूरच्या पहिल्या आदिवासी सरपंच सौ. अलका पवार, खेळाडू माधुरी खराडे, नझिमा हुरजूर, संजाली मालवणकर,  तृप्ती दामले-कुडाळकर, कालभैरव बचत गट पाट, एकता बचतगट वेताळबांबर्डे, स्वामी समर्थ बचतगट पिंगुळी, सिध्दार्थ बचतगट शिवापूर आदीसह  उमेद अभियान कक्षाच्या महिला, पं.स. आरोग्य कर्मचारी, महिला, अंगणवाडी आशा सेविका आदींचा विशेष गौरव करण्यात आला. महिलांच्या वतीने माधुरी खराडे व सौ. प्रतिक्षा कदम - शिवापूर यांनी  मनोगत व्यक्‍त केले. प्रास्ताविक गटविकास अधिकारी विजय चव्हाण तर सुत्रसंचालन  सौ. सायली सामंत, व सौ. मदने यांनी केले. दरम्यान जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनीही  या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. दिवसभर चालेल्या या कार्यक्रमात  महिलांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम रंगतदार ठरले.