Sun, Aug 09, 2020 10:08होमपेज › Konkan › शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांसाठी शरद पवारांसोबत! 

शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांसाठी शरद पवारांसोबत! 

Published On: May 03 2018 1:29AM | Last Updated: May 02 2018 11:40PMकुडाळ : प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही आपली बँक आहे. सर्वसामान्य शेतकर्‍यांची बँक आहे. शेतकर्‍यांच्या हिताच्या प्रश्‍नाकरिता राज्यसभेत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार जे जे मुद्दे-प्रस्ताव मांडतील त्या मुद्द्यांना मी पाठिंबा देईन, शेतकर्‍यांच्या प्रश्‍नासाठी मी सदैव लढत राहीन, अशी ग्वाही माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नुतन वास्तूच्या उद्घाटनप्रसंगी दिली. विशेष म्हणजे या कार्यक्रमात बँकेचे चेअरमन सतिश सावंत यांच्या कामाचे खास कौतुक यावेळी राणे यांनी करून सुंदर इमारतीबरोबर काम दर्जेदार करा व यशाची कमान कायम ठेवा  असा सल्‍ला दिला.

सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालयाच्या नूतन वास्तूंचे उद्घाटन राणे  यांच्या  हस्ते महाराष्ट्र दिनी  संपन्न झाले. कोल्हापूर जिल्हा  बँकेचे  अध्यक्ष  आ. हसन मुश्रिप, डी.वाय.पाटील कारखान्याचे चेअरमन  माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, आ. नितेश राणे, जि.प. अध्यक्ष सौ. रेश्मा सावंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतिश सावंत, उपाध्यक्ष सुरेश दळवी, जिल्हा  बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरूध्द देसाई आदीसह सर्व संचालक, बँकेचे ग्राहक, हितचिंतक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नारायण राणे म्हणाले, जिल्हा बँकेच्या कामाचे माजी मंत्री तथा आ. हसन  मुश्रिप व आ. सतेज पाटील यांनी केलेले कौतुक महत्त्वाचे आहे. कारण ही दोन्ही प्रमुख मंडळी सहकार क्षेत्रातील आहेत त्याचे गौरवोद‍्गार आपल्यासाठी चांगले आहेत. सिंधुदुर्ग वासियांच्या जीवनात जिल्हा बँकेची भुमिका महत्वाची आहे. 1983 साली जिल्हा बँकेची  निर्मिती झाली. आज गेल्या  35 वर्षांत  जिल्हा बँकेने 99 शाखापर्यंत झेप घेतली असून बँकेची 3 हजार कोटीची उलाढाल आहे मात्र त्या तुलनेत रत्नागिरी जिल्हा बँकेची कामगिरी नाही. आज आपली बँक ‘अ’ वर्गात असून सतिश सावंत यांच्या नेतृत्वाखाली चांगला  कारभार चालवित आहे. बँकेच्या माध्यमातून चांगले काम करून अध्यक्षांसह  सर्व संचालकांनी कोकणातील लोकांनाही सहकार कळतो हे दाखूवन दिले. जिल्ह्याच्या बाहेर  या बँकेच्या शाखा उघडण्यासाठी शासन  व आरबीआयने परवानगी द्यावी. आपली बँक शेतकर्‍यांसह पोल्ट्री, डेअरी,  रिक्षा,  शिक्षण आदीसाठी काम करत आहे. याच्याकरिता  वेगवेगळे उपक्रम राबवित आहे. बँक कर्मचार्‍यांना यावर्षीही 20 टक्के बोनस दिला  जाईल, असे जाहीर केले. संविता आश्रमचे संचालक संदीप परब यांना बँक कर्मचार्‍यांनी 51 हजार रुपयाची देणगी दिल्याबद्दल कर्मचार्‍यांचे राणे यांनी कौतुक करत बँकेचा असाच आलेख उंचावत ठेवा असे आवाहन केले.

आ. मुश्रीप म्हणाले की, सिंधुदुर्ग हा एक छोटासा जिल्हा जिथे ऊस नाही, उसाकरिता  कर्ज  नाही तरीही लोकांनी  या बँकेवर विश्‍वास ठेवला  बँकेचा एनपीए 0 टक्के, 10 कोटीचा निव्वळ नफा ही कामगिरी निश्‍चित कौतुकास्पद आहे.  भविष्यात ही बँक राज्यात प्रथम यावी अशी अपेक्षा व्यक्‍त केली. शिवरामभाऊ  अध्यक्ष असताना जशी  बँकेची प्रगती  होती तशीच  आता प्रगती सुरू आहे आता जिल्हा बँकेने जिल्ह्याच्या  बाहेर शाखा  काढण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी  खा.  राणे  पुढाकार  घेतील असा विश्‍वास व्यक्‍त केला.

आ. सतेज पाटील म्हणाले, 15 वर्षापूर्वी डी.वाय. पाटील साखर कारखाना काढताना आम्हाला कुठलीही बँक कर्जाकरीता पुढे आली नाही मात्र सिंधुदुर्ग जिल्हा बँक  पुढे आली म्हणून  कारखाना उभा राहिला. आज नॅशनल बँक आम्हाला  रेड कारपेट टाकत आहेत पण मी कर्ज घेणार नाही. यापुढेही सिंधुुदुर्ग बँकेकडून कर्ज घेणार असल्याचे सांगितले. कारखाना सुरू केला तेव्हा 7 हजार टन ऊस कोकणातून येत होताआता 1 लाख  टन ऊस येत आहे, त्यामुळे  आमच्या कारखान्याने खास कोकणसाठी ‘केन हाटवेस्टींग’ मशिन  घेण्याचे ठरविले आहे. 

आ. नितेश राणे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हावासिय आणि जिल्हा  बँक याच एक अतुट नात तयार झाले आहे.  बँकेची सर्व टिम  जिल्हावासियांच्या आयुष्याच परिवर्तन करण्याच काम करीत आहे. जिल्हा बँकेने रिक्षा व्यावसायिकांना जसा उपक्रम सुरू केला तसेच  उपक्रम राबवावेत असे मत व्यक्‍त केले.सतिश सावंत म्हणाले,  2008 मध्ये राणेंच्या नेतृृत्वाखाली जिल्हा बँकेचे काम सुरू झाले. त्यावेळी केवळ 500 कोटीच्या आत ठेवी होत्या आज  1700 कोटी ठेवी आणि  3 हजार कोटीची  उलाढाल आहे. 2013 मध्ये राणेंनी या नूतन इमारतीचे  भूमिपूजन केले त्यावेळी त्यांनी गोरगरिब शेतकर्‍यांसाठी उपक्रम राबवून त्यांचे  संसार उभे करा अशा सुचना  केल्या होत्या. त्यानुसार  शेतकर्‍यांसाठी पुरक असे  ऊस लागवड, शेळीपालन, कुक्कुटपालन, फळप्रक्रिया  आदी  प्रकल्पांना  मायक्रोफायनान्स केले आणि शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढविण्याचे  काम केले. दूध डेअरीत  लक्ष घातल्याने आज  प्रतिदिन  35 हजार लिटर  दुध गोळा होते. वाडोस सारख्या भागात महिना 5 लाख कोंबडी गोव्यात पाठविली  जातात  तर प्रतिदिन  25 हजार अंड्याची निर्मिती होते. एकुणच ज्यांना पत नाही त्यांना पतपुरवठा  करून बँकेने त्यांना पत देण्याचे काम केले. बँकेत 98 शाखामध्ये एनएफटी,  आरटीजीएस, 39  एटीएम सेंटर, फिरते  एटीएम अशाप्रकारे संगणक प्रणाली सुरू केली तसेच आता खाते उघडल्यानंतर 5 मिनिटात  एटीएम देण्याची  सुविधा केली आहे. 3 वर्षापूर्वी शेतकर्‍यांच्या मुलांना 4 लाखापर्यंत शैक्षणिक कर्ज देण्याचे सुविधा सुरू केली असल्याचे सांगितले.  बँकेची 3 हजार कोटीची उलाढाल 5 हजार कोटीपर्यंत येत्या 5 वर्षात नेऊ असा विश्‍वास  सावंत यांनी व्यक्‍त करत प्रशासकीय चेअरमन कै. केशवराव राणे, डी.बी. ढोलम व शिवरामभाऊ जाधव यांना आदरांजली अर्पण केली.    

नारायण राणेंच्या हस्ते महाराष्ट्र शासनाची अण्णासाहेब पाटील महामंडळ योजना, सोसायटींना 8 टक्के दराने  पडीक जमिन  लागवड योजना, भाग्यलक्ष्मी वासरू संगोपन योजना, धनलक्ष्मी  गावरान कुक्कुटपालन योजना, बेरोजगार रिक्षा व्यावसायिकांना पतपुरवठा या पाच योजनांचा  शुभारंभ करण्यात आला.ठेकेदार  रघू नाईक, आर्किटेक मिराशी, इलेक्ट्रिक ठेकेदार  वायंगणकर व चित्रकार समीर  चांदरकर यांचा  राणेंच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  प्रास्ताविकात  सीईओ अनिरूध्द देसाई यांनी बँकेच्या  प्रगतीचा आलेख कथन केला.  यावेळी संचालक विकास सावंत, आर.टी.मर्गज,अविनाश माणगांवकर, गुलाबराव चव्हाण,  व्हिक्टर डॉन्टस,  आत्माराम ओटवणेकर, दिगंबर पाटील, निता राणे, प्रमोद धुरी, प्रकाश परब, प्रशांत परब, विलास गावडे, प्रकाश मोर्ये,  विद्याप्रसाद बांदेकर, बॅकेचे अधिकारी प्रमोद गावडे, पी.डी. सामंत आदी उपस्थित होते. आभार सीईओ देसाई यांनी मानले. सूत्रसंचालन कर्मचारी युनियनचे नेते शरद सावंत यांनी केले.

खा. नारायण राणे यांची विकास सावंत यांच्याशी चर्चा

जिल्हा बँकेच्या संचालकांमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विकास सावंत आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस यांचा समावेश आहे. हे दोघेही व्यासपीठावर होते. राणे यांचा सत्कार त्यांच्या स्वाभिमान पक्षाचे नेते जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. व्हिक्टर डान्टस यांच्या हस्ते राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांचा तर विकास सावंत यांच्या हस्ते काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा बँकेच्या आयोजकांनी हा योग बरोबर जुळवून आणल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी सुरू होती. या दरम्यान विकास सावंत यांना राणे यांनी आपल्या बाजूला बोलावले आणि चर्चा केली. राणे यांनी काँग्रेस सोडल्यानंतर विकास सावंत यांनी सिंधुदुर्गातील काँग्रेसचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी धडपड सुरू केली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर राणे विकास सावंत यांच्याशी कार्य बोलले असतील याची उत्सुकता कार्यक्रमस्थळी होती.

Tags : Konkan, Sharad Pawar,  farmers, questions