Wed, Aug 12, 2020 09:03होमपेज › Konkan › राऊत विरोधी उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करतील

राऊत विरोधी उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करतील

Published On: Apr 22 2019 1:33AM | Last Updated: Apr 21 2019 10:31PM
मालवण ः प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप व शिवसेना पक्षातील कार्यकर्त्यांच्या विचारधारा वेगवेगळ्या असल्या तरी युती झाल्यानंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत  एकदिलाने काम करत युतीचे उमेदवार खा. विनायक राऊत यांचा जिल्ह्यात जोरदार प्रचार केला. महायुतीचे कार्यकर्ते एकजुटीने एक संघटना म्हणून काम करत आहेत. गेल्या पाच वर्षात खा. राऊत यांनी विविध प्रश्‍न मार्गी लावल्याने जनतेचे त्यांना पाठबळ असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत खा. विनायक राऊत हेच विरोधी उमेदवारांची डिपॉझिट जप्त करत जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून येतील अशा विश्वास भाजप- शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्‍त केला.

मालवण शिवसेना शाखा येथे भाजप- शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत युतीची भूमिका स्पष्ट केली. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाबा मोंडकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, शिवसेना तालुकप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, भाजपचे शहराध्यक्ष बबलू राऊत, शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी, भाजप तालुका चिटणीस महेश मांजरेकर, नंदू गवंडी आदी व इतर उपस्थित होते.

बाबा मोंडकर म्हणाले, मच्छीमारांचे प्रश्‍न न सोडविल्याचा आरोप  विरोधक खा. राऊत यांच्यावर करत आहेत. मात्र खा. राऊत यांनी एलईडी मासेमारी बंदी साठी संसदेत आवाज उठविला. खा. राऊत हे पंतप्रधान मोदी यांच्या टीममधील एक खासदार असून सर्व खासदारांच्या माध्यमातून पंतप्रधान प्रश्‍न सोडवित असतात. गेल्या सत्तर  वर्षांमध्ये प्रथमच भारताला बोलणारा पंतप्रधान मिळाला आहे. सोमवंशी अहवाल लागू करून एलईडी मासेमारी बंदीचा कायदा हा पूर्ण देशासाठी बनला आहे हे विरोधकांनी लक्षात घ्यावे. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा म्हणून युतीच्या सत्ता काळात घोषित झाला होता. गेल्या पाच वर्षात खा. राऊत यांनी विविध प्रश्‍नांचा पाठपुरावा केला. त्यामुळेच कोकणसाठी स्वतंत्र पर्यटन महामंडळ झाले, सीआरझेड  शिथिलीकरणासाठी अधिसूचना पारीत झाली. जिल्ह्यात एमआयडीसीसाठी निकष बदलण्यासाठी खा. राऊत यांनी प्रयत्न केले. जिल्ह्याची अर्थव्यवस्था बदलण्याची ताकद असणार्‍या ‘चांदा ते बांदा’ योजनेतून विविध उपक्रम राबविले गेले. जनतेला मूलभूत गोष्टी देण्याचे काम युती सरकारने केले.म्हणूनच  जनता खा. राऊत यांच्या सोबत असून  ते विजयी होतील असा विश्‍वास मोंडकर यांनी व्यक्‍त केला. तर बबन शिंदे यांनी भाजप- शिवसेना- रिपाइंचे कार्यकर्ते एकजुटीने प्रचाराचे काम करत असल्याचे सांगितले.

हरी खोबरेकर म्हणाले, पूर्वीच्या सत्ताधार्‍यांच्या काळात विविध प्रश्‍नांसाठी युतीच्या कार्यकर्त्यांना आंदोलने करावी लागत होती. मात्र युतीची सत्ता आल्यावर सर्व कामे होताना दिसत आहेत.  यापूर्वीच्या सत्ताधार्‍यांना न जमलेल्या गोष्टी खा. राऊत यांनी युती सरकारच्या माध्यमातून रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये करून दाखविल्या. येथील जनतेवर व मच्छीमारांवर खरा अन्याय स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनीच केला आहे, आणि हे आम्ही पुराव्यासाहित सिद्ध करून दाखवू शकतो असा दावा हरी खोबरेकर यांनी केला. जनता सुज्ञ असून सुसंस्कृत असणारे, टॉप टेन खासदारांच्या यादीत नाव असलेल्या खास. राऊत यांनाच जनता पुन्हा विजयी करेल असा विश्वासही खोबरेकर यांनी व्यक्‍त केला.