Sun, Aug 09, 2020 11:09होमपेज › Konkan › पावसाने वरंदा घाट खचला

पावसाने वरंदा घाट खचला

Published On: Jun 12 2018 12:52AM | Last Updated: Jun 11 2018 11:11PMचिपळूण : खास प्रतिनिधी

तालुक्यातील वीरबंदराकडे जाणारा ‘वरंदा’ घाट खचल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांची मोठी गैरसोय झाली आहे. तीन दिवस कोसळलेल्या पावसामुळे तालुक्यात ठिकठिकाणी पडझड झाली आहे. अनेक ठिकाणी दरड कोसळून नुकसान झाले असून तालुक्यातील शेवटचे टोक वीरबंदरच्या अलीकडील घाट अनेक ठिकाणी खचल्याने वाहतूक बंद झाली आहे.

चिपळूणपासून सुमारे 45 कि.मी. अंतरावर वीरबंदर हे गाव आहे. वीर गावाच्या अलीकडे ‘वरंदा’ घाट लागतो. दोन दिवस पडलेल्या पावसात हा घाट अनेक ठिकाणी खचला आहे.वळणावळणावर रस्त्यांच्या कडा खचल्या असून अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत. या शिवाय ठिकठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. त्यामुळे या मार्गावर येत्या पावसाळ्यात वाहतूक सुरू होईल की नाही, अशी शंका आहे. सद्य:स्थितीत एस.टी. वाहतूक पूर्णत: बंद असून जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावरील मात काढण्याचे काम सुरू आहे. ज्या-ज्या ठिकाणी घाट खचला आहे अशा धोकादायक जागेवर चुन्याचे दगड ठेवण्यात आले आहेत. जेसीबीच्या माध्यमातून रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू असले तरी पावसामुळे घाट अनेक ठिकाणी खचल्याने वाहतूक करणे धोकादायक बनले आहे.

या भागात वीर व काजुर्ली ही दोन गावे येतात. त्यामुळे येथील ग्रामस्थांची घाट खचल्याने गैरसोय होणार आहे. शाळा, महाविद्यालयने आता सुरू होणार असताना वाहतूक ठप्प झाल्यास गैरसोय होणार आहे. चिपळूण आगारातून सुटणार्‍या वीरबंदर या तीन बसफेर्‍या सध्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना फटका बसला आहे. बांधकाम विभागाने दुरूस्तीसाठी प्रयत्न सुरू केले असले तरी घाट धोकादायक बनल्याने यंदाच्या पावसाळ्यात वाहतूक करणे धोक्याचे ठरणार आहे.