Tue, Sep 22, 2020 01:19होमपेज › Konkan › सावंतवाडी येथे गिरणी कामगारांची एकजूट

सावंतवाडी येथे गिरणी कामगारांची एकजूट

Last Updated: Jan 15 2020 1:45AM
सावंतवाडी : 

गिरणी कामगारांनी चळवळ उभारल्याशिवाय  न्याय मिळणार नाही. सरकार कोणतेही असो आम्हाला त्याच्याशी देणंघेणं नसून आम्हाला फक्‍त गिरणी कामगारांच्या मागण्यांसाठी लढा द्यायचा आहे. काहीजण गिरणी कामगारांमध्ये फूट पाडण्याचे काम करीत आहेत, मात्र याकडे लक्ष न देता गिरणी कामगारांनी जागृत होऊन संघटित होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन गिरणी कामगारांच्या सभेत सेन्चुरी मिल कामगार मंचाचे अध्यक्ष नंदू पारकर यांनी केले. येथील महालक्ष्मी मंगल कार्यालय येथे गिरणी कामगारांची सभा झाली आणि यामध्ये गिरणी कामगारांची एकजूट दिसून आली.

व्यासपीठावर सेक्रेटरी कामगार नेते हेमंत गोसावी, कार्यकर्ते दोडामार्ग येथील गिरीश परब, महाराष्ट्र विकास मंचाचे अध्यक्ष जितेंद्र सावंत, जितेंद्र राणे, रवींद्र गावडे, योगेश राणे, संजय परब, अमोल परब प्रकाश नाईक आणि सागर सावंत आदी उपस्थित होते.

ते म्हणाले, आज गिरणी कामगारांची अवस्था दयनीय आहे.  गिरणी कामगारांच्या घरांसाठी हालचाली होत नाही, याबद्दल सर्व युनिटच्या पदाधिकार्‍यांच्या वतीने आम्ही न्याय मागणार आहोत. आमचा कामगार वृद्धावस्थेकडे झुकत आहे. असे असतानाही मागण्यांकडे सरकारकडून दुर्लक्ष केले जाते. राज्य सरकार जर आमच्या मागण्या पूर्ण करत नसेल तर आम्हाला लढा देऊन हे कार्य पूर्ण करावे लागेल.  आपल्या मागण्यांसाठी गिरणी कामगार न्याय मागत असताना कुठलाच पक्ष याकडे लक्ष देत नाही. यापुढेही कोणता पक्ष मदतीला येणार नसल्याचे लक्षात घेऊन आता संघटित व्हा,  असे आवाहन पारकर यांनी केले.

ते म्हणाले, संघटना बळकट करावयाची असेल तर धडाडीचा कार्यकर्ता निर्माण करायला हवा. गिरणी कामगारांच्या मागण्यांसाठी आम्ही अनेक गुन्हे अंगावर घेतले आहेत. फडणवीस मुख्यमंत्री असताना आम्ही आंदोलन छेडून वर्षा बंगल्यात घुसलो. आमच्यावर गुन्हे दाखल झाले. आमच्या संघटनेत जे पदाधिकारी आहेत त्यातील एकालाही अजूनही घर मिळाले नाही. जमा वर्गणीतून गाडी भाडे देतो. कार्यकर्तेही पैशाशिवाय काम करतात. आपण लोकशाहीच्या मार्गाने मतदान करतो. त्यामुळेच आपल्यालाही न्यायासाठी बोलायचा अधिकार आहे. ही जागृती गिरणी कामगारात होणे गरजेचे आहे. गिरणी कामगारांची चळवळ चालवल्याशिवाय आपल्याला हक्क मिळणार नाहीत. काही मिल कामगार घर योजनेत बसत नाहीत, अशा गिरणी कामगारांना संभ्रमावस्था आहे. तर काहीजण संपर्कात नसल्याने त्यांना गिरणी कामगारांच्या हक्कांची पुरेशी जाणीव नाही. त्यांनी प्रवाहात येणे गरजेचे असल्याचे पारकर यांनी स्पष्ट केले.

मध्यप्रदेशमधील एका मिलमधील गिरणी कामगारांसाठी आम्ही धडक दिली. पाठपुराव्यानंतर त्यातील कामगारांचा पगार सुरू झाला. असेच कार्य आम्हाला आपल्या मागण्यासाठी करावयाचे आहे. तुम्ही माझ्या पाठीशी राहिला तर सरकार समोर माझा आवाज वाढेल. या सरकारला जाग आणून देऊ. सत्ता कोणाचीही असली तरी आपल्याला त्यात देणेघेणे नाही. आम्हाला पक्षीय राजकारण नको तर निर्णय देणारे आणि आपल्या मागण्या पूर्ण करणारे राजकारण हवे आहे. ते आम्हाला मिळत नसेल तर आम्हाला आता मुठी आवळाव्या लागतील. आमच्या गिरणी कामगारांना बिथरण्याचा प्रयत्न झाला. मात्र जेवढी संकटे आम्ही झेलणार तेवढेच आम्ही मजबूत होणार. गिरणी कामगारांच्या प्रश्‍नासाठी नक्कीच आंदोलन छेडू, असा विश्‍वासही पारकर यांनी व्यक्‍त केला.
 

 "