Mon, Nov 18, 2019 21:24होमपेज › Konkan › जेवणाची ऑर्डर देऊन ‘ऑनलाईन’ फसवणुकीचा प्रयत्न!

जेवणाची ऑर्डर देऊन ‘ऑनलाईन’ फसवणुकीचा प्रयत्न!

Last Updated: Oct 18 2019 1:51AM
आचरा ः वार्ताहर

आचरा येथे हॉटेल व भोजनालयाचा व्यवसाय करणार्‍या दुकानदारकांना एक अज्ञात भामटा एसआरपी, आर्मी अधिकारी असल्याचे भासवत 25 ते 30 व्यक्‍तींच्या जेवणाची ऑर्डर मोबाईल द्वारे देतो. काही कालावधीनंतर तो पुन्हा कॉल करुन जेवणाच पैसे अ‍ॅडव्हान्स दयायचे आहेत, पैसे ऑनलाईन ट्रान्सफर करण्यासाठी तो व्यावसायिकांकडे एटीएमची माहिती मागत आहे. दुसरीकडे प्रत्यक्षात ऑर्डरनुसार कुणीही जेवायला येत नसल्याने बनविलेले जेवण वाया जाऊन व्यावसायिकांना आर्थिक नुकसान करत आहे.यामुळे हॉटेल व्यावसायिकांवर मन:स्तापाची वेळ आली आहे.

याबाबत आचरा व्यापारी संघटनेने  पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली आहे. अज्ञात भामटयाचा शोध घेण्याची मागणी सहायक पोलीस निरिक्षक जयदीप कळेकर यांच्याकडे केली आहे. आचरा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अभिजित सावंत, खजिनदार जयप्रकाश परूळेकर, देवेंद्र नलावडे, नीलेश सरजोशी, मांगिरिश सांबारी, आशिष बागवे,रुपेश हडकर, अर्जुन बापर्डेकर, अमोल माळगावकर, शरद देसाई, पंकज आचरेकर व इतर व्यापारी उपस्थित होते. 

आचरा व्यापारी संघटनेने याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, हॉटेल व्यावसायिकांना फोन करणारी व्यक्‍ती आपण आर्मी किंवा एसआरपी मध्ये  अधिकारी असून आचरा भागात सिक्रेट मिशनसाठी आपली टिम दाखल झाल्याचे सांगते. आपल्या टीम साठी जेवणाची ऑर्डर फोनवरून दिल्यावर काही कालवधीनंतर पुन्हा कॉल करून ऑर्डरचे आगाऊ पैसे भरण्यासाठी  हॉटेल मालकाचा एटीम कार्ड नंबर व ओटीपी नंबर मागतो. मात्र, एटीम कार्ड व ओटीपी नंबर देण्यास नकार दिल्यानंतर फोन कट करत संपर्क करण्याचे बंद करतो.

त्याच्या व्हॉटसअ‍ॅप नंबरवर आर्मीच्या वेशातील फोटोचे स्टेटस आहे.  आचरा येथील हॉटेल डॅफोडिलसचे मालक नीलेश सरजोशी, बागवे लंच होमचे  आशिष बागवे, हॉटेल राणेशाहीचे महेश राणे, साटम लंच होमचे विकास साटम यांना असे कॉल आले आल्याचे व त्याचा फटका बसल्याचे म्हटले आहे.

ऑर्डरप्रमाणे तयार केलेले जेवण फूकट गेल्याने आर्थिक फटका त्यांना सहन करावा लागला. कॉल करणारी व्यक्‍ती व्यापार्‍यांकडून जेवणाच्या ऑर्डरचे पैसे देण्याचे निमित्त करून त्यांच्या एटीएमची माहिती घेवून पैसे लाटण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय व्यापार्‍यांनी व्यक्‍त केला. आपण या प्रकारात जातीने लक्ष घालून व्यापार्‍यांना लुटू पाहणार्‍या भामट्याचा लवकारात लवकर शोध घ्यावा व भविष्यात व्यापार्‍यांची होवू शकणारी फसवणूक टाळावी अशी मागणी आचरा व्यापारी यांनी पोलिसांकडे  निवेदनाद्वारे केली 
आहे.

    आर्मी अधिकारी असल्याची बतावणी

    25-30 लोकांसाठी देतो जेवणाची ऑर्डर

    आगाऊ बिल देण्यासाठी एटीएम कार्डची मागतो माहिती