होमपेज › Konkan › क्रिकेटचे ३० सामने केवळ १५ हजारांत खेळवा!

क्रिकेटचे ३० सामने केवळ १५ हजारांत खेळवा!

Published On: Oct 26 2018 12:52AM | Last Updated: Oct 25 2018 9:57PMगणेश जेठे
 

जगप्रसिद्ध क्रिकेटीयर सुनील गावस्कर ज्या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रिकेट खेळाची मात्र बिकट स्थिती आहे. सुनील गावस्कर यांचा आदर्श ठेवून क्रिकेटमध्ये करिअर घडवू पाहणार्‍या सिंधुदुर्गातील शालेय व महाविद्यालयीन खेळाडूंच्या सामन्यांसाठी केवळ 15 हजार रुपये पुरविण्याचा दळभद्रीपणा क्रीडा खात्याकडून केला गेला आहे. त्याचा परिणाम म्हणून क्रीडा विभागाच्या जिल्ह्यातील अधिकार्‍यांना खर्च कमी येण्यासाठी केवळ पाच ओव्हरचे सामने एकाच दिवसात आटोपावे लागले आहेत.

एका बाजूला सरकारमधील मंत्री आणि राज्यकर्ते क्रीडा धोरणावर भरभरून बोलत आहेत. ‘असे अनेक सुनील गावस्कर जिल्ह्यात निर्माण व्हायला हवेत’ अशी भाषणे ठोकत आहेत. त्याचवेळी खेळांची अशी केविलवाणी परिस्थिती बघून संताप आल्याशिवाय राहत नाही. सुमारे 40 ते 45 खेळांच्या दरवर्षी स्पर्धा घेण्याची जबाबदारी क्रीडा विभागाची आहे. सिंधुदुर्गनगरी येथे क्रीडा संकुल असून तिथेच या स्पर्धा घेतल्या जातात. क्रिकेट स्पर्धांचा हंगाम सध्या सुरू आहे. जिल्ह्यात 14 वर्षे वयोगट, 16 वर्षे वयोगट आणि 19 वर्षे वयोगटातील क्रिकेट संघांमध्ये स्पर्धा नुकत्याच घेण्यात आल्या. प्रत्येक तालुक्याचा मुलींचा व मुलांचा संघ खेळविण्यात आला. विभाग स्तरावर दोन संघ पाठविण्याची जबाबदारी जिल्हा स्तरावरील क्रीडा अधिकार्‍यांची होती. आखून दिलेल्या धोरणानुसार सुमारे 30 सामने या तीनही वयोगटात मिळून खेळवले गेले.

सिंधुदुर्गनगरी येथील क्रीडा संकुलातील मैदानावर हे सामने खेळवले गेले. लेदरबॉल क्रिकेट सामने असल्याने कारपेट क्रीडा विभागाने टाकले होते. फक्‍त पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि पंचांचे मानधन देण्यात आले होते. बाकी बॅटस्, बॉल, पॅडस्, स्पोर्टस् शूज आणि ट्रॅकसूट सर्व काही मुले आणि शाळांनी पुरविले होते. कॉमेंट्रीसाठी ना लाऊडस्पीकर की ना खेळाडूंना बसण्याची व्यवस्था. मैदानावरील गवतही कापलेले नव्हते. सर्वत्र अस्वच्छता होती. खेळाडू, शिक्षक व सहकारी झाडांच्या सावलीत आधार घेऊन होते. तरीही सुनील गावस्कर, विराट कोहली बनण्याची स्वप्ने घेऊन प्रत्येक खेळाडू जिंकण्यासाठी जीव तोडून खेळत होता. बरे हाताला, पायाला, शरीराला बॉल लागला तर डॉक्टरही नव्हते. सर्व काही आलबेल आणि अनागोंदी होती.

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिनेश साळगावकर हे अष्टपैलू व्यक्‍तिमत्त्व. तेही या स्पर्धेसाठी काही खेळाडूंसोबत मैदानात होते. त्यांना ही दुःस्थिती पहावली नाही. त्यामुळे त्यांनी तात्काळ जिल्हा क्रीडा अधिकार्‍यांची भेट घेतली. तिथे त्यांना मिळालेली माहिती अवाक् करणारी होती.

वर्षभर क्रीडा विभागाच्या अधिकार्‍यांना स्पर्धांचे आयोजन करावे लागते. क्रिकेट स्पर्धांसाठी फक्‍त 15 हजार रुपये मिळतात. तीन वयोगटातील सामने खेळविण्यासाठी किमान तीन दिवस लागतात. त्यामुळे एका दिवसासाठी खर्चाला मिळतात फक्‍त पाच हजार रुपये. खरेतर विभाग स्तरावर आठ ओव्हरचे सामने खेळवले जातात. परंतु सिंधुदुर्गात एक सामना पाच ओव्हरमध्ये आटोपावा लागतो. तसं नाही केलं तर मग दिवस वाढतात आणि दिवस वाढले तर खर्च कसा भागवणार? असा प्रश्‍न पडतो. पैसे नाहीत म्हणून पुरेसा खेळ नाही, जिल्ह्यात पुरेसा खेळ नाही म्हणून विभागस्तरावर ताकदीने खेळता येत नाही आणि तिथे पराभव म्हणून मग राज्य स्तरावर जाता येत नाही. ही वस्तुस्थिती म्हणजे दळभद्रीपणा नाही का? या प्रश्‍नाचे उत्तर होय असेच आहे. 12 कोटींच्या खर्चाची पुले बांधायची आणि दुसरीकडे एका दिवसातील सामन्यांना फक्‍त पाच हजार रुपये द्यायचे. हा आर्थिक असमतोलपणा नाही का? याचेही उत्तर होय असेच आहे.

सर्वच खेळांसाठी नाही पण निदान क्रिकेट, कबड्डी, व्हॉलिबॉल अशा खेळांना तरी अधिकचा निधी द्यायला हवा. जिल्हा वार्षिक विकास आराखडा 190 कोटींचा आहे. त्यातून काही तरतूद या स्पर्धांसाठी करावयास हरकत नाही. तांत्रिक अडचण येत असेल तर शासनाची परवानगी घ्यावी, परंतु 15 हजार रुपयांऐवजी किमान लाखभर रुपये तरी खर्चाला द्यावेत. त्यातून पॅड, बॉल, कॅप्स् पुरविता येतील. मैदान साफ करता येईल. 

कॉमेंट्रीसाठी लाऊडस्पीकर पुरविता येतील. अगदी पूर्ण आठ ओव्हरचे सामने दोन दिवस खेळवता येतील, असे घडले तरच त्यातून एखादा सचिन तेंडुलकर निर्माण होईल. नुसते बोलून आणि भाषणे करून काय उपयोग आहे? असा हा प्रश्‍न आहे.

दिनेश साळगावकर घेणार पुढाकार

आता दिनेश साळगावकर यांनी ही जबाबदारी खांद्यावर घेतली आहे. क्रीडा खात्याचे अधिकारी, जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन हा प्रश्‍न सोडवावा लागेल. त्यासाठी आपण कसोशीने प्रयत्न करू असे म्हटले आहे. परंतु त्याचवेळी जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार, सर्व आमदार यांनीही यात लक्ष घालून स्पर्धांचा निधी वाढवून घ्यावा अशी आपले भवितव्य घडवू पाहणार्‍या जिद्दी खेळाडूंची अपेक्षा आहे.