Mon, Aug 10, 2020 05:35होमपेज › Konkan › तीन हजार शेतकर्‍यांना पुराचा फटका

तीन हजार शेतकर्‍यांना पुराचा फटका

Published On: Sep 18 2019 1:50AM | Last Updated: Sep 17 2019 8:42PM

file photoरत्नागिरी : प्रतिनिधी

ऑगस्ट महिन्यात जोरदार पाऊस पडल्याने आलेल्या पुरात जिल्ह्यातील 450 गावातील तीन हजार शेतकर्‍यांच्या भातपिकाचे नुकसान झाले आहे. एकूण 1100 हेक्टर क्षेत्रावरील भातपिकाचे 66 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.यंदाच्या वर्षी पाऊस उशिराने सुरू झाला तरी जुलै महिन्यात लागवडीची कामे पूर्ण करण्यात आली. जुलै महिन्यात शेतीसाठी पोषक पाऊस पडला. मात्र, ऑगस्टमध्ये पावसाने कहरच केला. मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे अनेक गावांमधील शेतीत पुराचे पाणी शिरले. पाण्याच्या प्रवाहाबरोबर गाळ, माती शेत जमिनीत येवून साचली. शिवाय आठवडाभर पावसाचे थैमान सुरू असल्याने नदीकाठची भात शेती कित्येक दिवस पावसात होती. पुरामुळे बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले होते. 

जिल्ह्यात  70 हजार 910 हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड केली जाते. दुय्यम पीक म्हणून नागली लावण्यात येते. 14 हजार 750 हेक्टर क्षेत्रावर नागली लागवड केली जाते. 809 हेक्टर क्षेत्रावर कडधान्य, 1180 हेक्टर क्षेत्रावर भाजीपाला तसेच 9130  हेक्टर क्षेत्रावर तृणधान्य, गळितधान्य 100 हेक्टर क्षेत्रावर लावण्यात येते. या वर्षी मुसळधार पावसामुळे नद्याने आलेल्या पूरामुळे खरीप हंगामातील भात पिक वाया गेले आहे. या शेतकजयांना दुबार पिकांची शक्यता नाही, केवळ रब्बी हंगामातीलच पिके तो घेऊ शकतो, यामुळे शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळणे आवश्यक आहे. पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात येणार आहे.

कृषी अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांनी केलेल्या पंचनाम्यात जिल्ह्यातील 450 गावातील 3 हजार शेतकर्‍यांच्या 1100 हेक्टर भातपिकाचे नुकसान झाले आहे. पुरामुळे 66 लाखाचे आर्थिक नुकसान झाले असून भविष्यात आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे. अद्याप पंचनाम्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.