Mon, Aug 10, 2020 03:56होमपेज › Konkan › ...तर स्वाभिमान पक्ष आंदोलन छेडणार

...तर स्वाभिमान पक्ष आंदोलन छेडणार

Published On: May 03 2018 11:22PM | Last Updated: May 03 2018 11:10PMरत्नागिरी ः प्रतिनिधी

मुंबई- गोवा महामार्गावरील खेड ते राजापूर दरम्यानचे चौपदरीकरणाचे काम संथगतीने होत असून, पावसाळ्यापूर्वी 40 टक्के काम पूर्ण न झाल्यास महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा पक्षाचे प्रवक्‍ते नित्यानंद दळवी यांनी दिला आहे. या कामात अनेक प्रकारे गैरकारभार होत असून स्थानिकांवर अन्याय होत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. 

गुरुवारी त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, खेड ते राजापूर या 190 किमी मार्गावर चौपदरीकरणाचे काम संथगतीने सुरू आहे. हे काम कल्याण इन्फ्रास्ट्रक्‍चर, चेतक इन्फ्रास्ट्रक्‍चर, एमईपी आणि केसीसी या चार कंपनींनी घेतले आहे. मात्र, हे काम करत असताना जुना रस्ता खराब झाला आहे. यामुळे या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अपघातग्रस्तांना ठेकदारांकडून कोणतीही नुकसान भरपाई दिली जात नाही. काम करताना कोणतीही सुरक्षितता बाळगली जात नाही. हे ठेकेदार बाहेरगावचे असल्याने स्थानिक ठेकेदारांना काम मिळेनासे झाले आहे.

चौपदरीकरणातील 30 टक्के प्रकल्पग्रस्तांना अद्यापही मोबदला मिळालेला नाही. त्यांच्या जमिनीच्या तक्रारी प्रांताधिकार्‍यांकडे सुरू आहेत. त्यामुळे या ठिकाणी अद्यापही कामाला प्रारंभ झालेला नाही. महामार्गावरील झाडांच्या गणनेतही भ्रष्टाचार झालेला आहे. या मार्गावर शासन दरबारी 40 हजार झाडे दाखवण्यात येत आहेत. प्रत्यक्षात मात्र याच्या निम्मी झाडे या मार्गावर आहेत. तोडलेल्या झाडांची वाहतूक करताना वेळेवर पासही उपलब्ध होत नाहीत. तसेच तोडून ठेवलेल्या झाडांच्या चोरीचे प्रमाणही वाढले आहे. आरवली ते वाकेड मार्गाचे काम सुरू झाले नसून, लोकप्रतिनिधींच्या आर्थिक देवाण घेवाणीत हे काम अडकले असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

यावेळी स्वाभिमान पक्षाचे मेहताब साखरकर, संकेत चवंडे, योगेश मगदूम आदी उपस्थित होते.