Mon, Aug 10, 2020 04:35होमपेज › Konkan › मार्लेश्‍वरचे मूळ देवस्थान उपेक्षित

मार्लेश्‍वरचे मूळ देवस्थान उपेक्षित

Published On: Jan 11 2019 1:18AM | Last Updated: Jan 10 2019 11:59PM
देवरूख : नीलेश जाधव

संपूर्ण राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या स्वयंभू श्री देव मार्लेश्‍वराचे देवरूख नजीकच्या मुरादपूर येथील मूळ देवस्थान दुर्लक्षित झाले आहे. ह्या देवस्थानाची सध्या दुरवस्था झाली आहे. मार्लेश्‍वराच्या मूळ देवस्थानची दुरवस्था झाल्याने भाविकांमधून चिंता व्यक्‍त करण्यात येत आहे.

मार्लेश्‍वराचे पहिले वास्तव्य हे संगमेश्‍वर तालुक्यातील मुरादपूर येथे होते. हे देवस्थान निसर्गरम्य व शांत ठिकाणी माळरानावर होते.  आख्यायिकेनुसार या ठिकाणी मार्लेश्‍वर देव ध्यानस्थ बसत असत. याचवेळी मुरादपूर गावावर मुघल साम्राज्यातील मुराद राजाचे वर्चस्व होते. मुराद राजा अत्यंत कूर व जुलमी होता. तो ग्रामस्थांवर अन्याय-अत्याचार करीत असे. त्याने मार्लेश्‍वराच्या मूळ स्थानाजवळच मशिद बांधली होती. 

मुराद राजा गावातील ग्रामस्थांना छळत असल्याने मार्लेश्‍वर देव अक्षरश: कंटाळले होते. त्यांना या ठिकाणी अजिबात करमत नव्हते. त्यामुळे त्यांनी तेथून एका शांत ठिकाणी जाण्याचे ठरवले व एके दिवशी ते अचानक आपले मूळ स्थान सोडून चालत निघाले. मुरादपूर येथून काही कि. मी. अंतरावर असणार्‍या आंगवली येथे रात्री आल्यानंतर त्यांनी हाका मारल्या. या हाका गावातील चर्मकाराने ऐकल्या. हा चर्मकार तेलाच्या दिवटीवर चप्पल शिवण्याचे काम करत होता. मार्लेश्‍वराने त्याला उजेड दाखवण्यास सांगितले. साक्षात देवाची ही विनंती चर्मकाराने मान्य करून मार्लेश्‍वराला उजेड दाखवला. दोघेही चालत चालत सह्याद्रीच्या कुशीत असणार्‍या कडेकपारीत असणार्‍या गुहेपाशी आल्यावर मार्लेश्‍वर देवाने तू आल्या पावली सावकाश परत जा व कोणाला काही सांगू नकोस, असे चर्मकाराला सांगून ते नाहीसे झाले. या नंतर हे मार्लेश्‍वराचे स्वयंभू देवस्थान म्हणून ओळखले जावू लागले, अशी आख्यायिका सांगितली जाते. 

जुलमी मुराद राजाच्या त्रासाला कंटाळलेल्या मुरादपूरमधील ग्रामस्थांनी मुराद राजाला संपवण्याचा विडाच उचलला होता. ग्रामस्थांनी मराठा सेनापतीच्या मदतीने मुराद राजाला अखेर  ठार मारले व त्याला तेथेच पुरले. तेव्हापासून या गावाला मुरादपूर असे नाव पडले, अशीही आख्यायिका ग्रामस्थांकडून सांगितली जाते. मार्लेश्‍वर पहिले ज्याठिकाणी वास्तव्यास होते. ते वास्तव्य प्राचीन काळात होते. त्यामुळे मार्लेश्‍वर देव मुरादपूर गाव सोडून गेल्यानंतर त्यांच्य मूळ स्थानाची सद्यस्थितीला अत्यंत दुरवस्था झाली आहे. या स्थानाचे पुरातन खांब पडले असून काही खांब केव्हाही पडण्याच्या स्थितीत आहेत. हे देवस्थान झाडा-झुडपांनी वेढले गेले असून मार्लेश्वराच्या या मुळ देवस्थानकडे कोणाचेच लक्ष नाही, त्यामुळे ते आजपर्यंत दुर्लक्षितच राहिले आहे.  

या मागणीकडे लक्ष द्यायला शासनाला वेळ नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. आता तरी शासनाने मार्लेश्‍वराच्या मूळ देवस्थानची डागडुजी करावी, अशी मागणी गावचे मानकरी बळीराम बांडागळे व गणेश बांडागळे यांनी केली आहे.उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर देवरूखमधील माँर्निंग क्रिकेट क्लबच्या सदस्यांनी बुधवारी या जागेची साफसफाई केली.