Mon, Aug 10, 2020 04:46होमपेज › Konkan › सिंधुदुर्ग जिल्ह्यात कडक लॉकडाऊन

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कडक लॉकडाऊन

Last Updated: Jul 03 2020 1:24AM
सावंतवाडी ः पुढारी वृत्‍तसेवा

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी गुरुवारपासून 8 जुलैपर्यंत संपूर्ण जिल्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हाधिकार्‍यांनी जाहीर केला. त्याची कडक अंमलबजावणी सुरू आहे. दरम्यान, या लॉकडाऊनच्या निषेधार्थ जिल्हा व्यापारी महासंघाने गुरुवारी जिल्हा बंदचे आवाहन केले होते. त्यामुळे गुरुवारी मेडिकल दुकाने वगळता अन्य सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवली. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख शहरांसह सर्व बाजारपेठांत कडकडीत बंद पाळण्यात आला. त्यामुळे जिल्हाभरात सर्वत्र शुकशुकाट जाणवला. दरम्यान, काही ठिकाणी विनाकारण फिरणार्‍यांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.

सावंतवाडीकरांनी कडकडीत बंद पाळला. त्यामुळे सावंतवाडी शहर सुनसान दिसत होते. दरम्यान, संपूर्ण जिल्ह्यात सर्वच शहरांमध्ये लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळाला. या लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात काही ठिकाणी पोलिस बंदोबस्त तर काही ठिकाणी दंगल काबू पथके तैनात ठेवली होती. 

जिल्ह्यात कोरोनासद‍ृश रुग्णांची संख्या वाढल्यामुळे जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा केली आहे. महिनाभराच्या अनलॉकनंतर काही तालुक्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढली. परिणामी, पुन्हा लॉकडाऊनचा पर्याय अवलंबावा लागला. सावंतवाडी, कुडाळ, कणकवली या प्रमुख शहरांबरोबरच मालवण, देवगड, वेंगुर्ले, दोडामार्ग, वैभववाडी या बाजारपेठांमध्येही शुकशुकाट जाणवला. 

सावंतवाडी शहरात सकाळी 6 वा.  जिल्हा पोलिस मुख्यालयातून दंगल काबू नियंत्रण पथक शहरात दाखल झाले. या पथकाने संपूर्ण शहरात फेरफटका मारुन पाहणी केली. मात्र, शहरात कुठेही नागरिकांची वर्दळ आढळली नाही. या पथकाच्या जवानांसह स्थानिक पोलिस प्रशासनही शहरात वारंवार फेरफटका मारत होते. शहरातील नागरिकही स्वतः ला क्वारंटाईन करून घेत या बंदमध्ये सहभागी झाले.

रस्त्यावर पोलिस, होमगार्ड व काबू पथकाचे जवान सोडून कोणीही दिसत नव्हते. पोलिसांच्या गाड्यांवरून सातत्याने नागरिकांना आवाहन केले जात होते. शहरातील पूर्ण बाजारपेठ बंद होती. सर्व दुकाने बंद ठेवली होती. भाजीपाला, दूध, औषधे या अत्यावश्यक सेवा वगळता कुठलीही  दुकाने सुरू ठेवली नव्हती. शहरातील शिरोडा नाका, कोलगाव बाहेरचावाडा, माजगाव जुना जकात नाका या ठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदी केली आहे. ठिकठिकाणी पोलिसांकडून विचारणा करून मगच शहरात सोडले जात होते. 

लॉकडाऊन असतानाही नाहक फिरणार्‍यांवर वचक ठेवण्यासाठी स्पेशल फोर्सची मदत घेण्यात आली. दरम्यान, जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला नागरिकांनी सहकार्य करावे अन्यथा कडक कारवाई करू, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला. त्याच बरोबर ध्वनीक्षेपकाच्या माध्यमातून याबाबत जनजागृती केली जात आहे. पोलिस निरीक्षक शशिकांत खोत, सहाय्यक पोलिस निरीक्षक अण्णासो बाबर व अन्य अधिकारी व कर्मचारी गस्त घालताना दिसत होते. 

महामार्गावर खारेपाटण व पत्रादेवी चेकपोस्ट येथे वाहनांची कडक तपासणी करण्यात आली. विशेषतः पुणे-मुंबई भागातून येणार्‍या वाहनांची व प्रवाशांची काटेकोर तपासणी करूनच त्यांना जिल्ह्यात प्रवेश देण्यात आला. पुढील सहा दिवस नागरिक, व्यापारी, वाहनचालकांनी लॉकडाऊन नियमांचे काटेकोर पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी केले आहे.
    
लॉकडाऊनच्या निषेधार्थ जिल्हा व्यापारी महासंघाकडून बंद

जिल्ह्यात विविध 

ठिकाणी नाकाबंदी

वाहनांची, प्रवाशांची काटेकोर तपासणी करूनच जिल्ह्यात प्रवेश