Sun, Aug 09, 2020 11:16होमपेज › Konkan › अपहार प्रकरणी तिघांवर फौजदारी 

अपहार प्रकरणी तिघांवर फौजदारी 

Published On: Mar 15 2018 10:52PM | Last Updated: Mar 15 2018 9:12PMशृंगारतळी : वार्ताहर

गुहागर तालुक्यातील वेळणेश्‍वर येथे पाखाडी बांधण्याच्या नावावर ठेकेदाराने ग्रा.पं. कडून 30 हजार रूपये घेऊनही वर्षभर पाखाडीच बांधली नसल्याची बाब उघडकीस आली होती. संबंधित ठेकेदार, तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक यांनी संगनमताने शासनाची फसवणूक करून अपहार केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुहागर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

गुहागर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी राजेंद्र शिवराम मोहिते यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार  सन 2013-14 मध्ये वेळणेश्‍वर गावामध्ये सुळाची या ठिकाणी  पाखाडी बांधण्यासाठी ग्रामपंचायतीने ठेकेदार रवींद्र दशरथ पोळेकर यांना पाखाडीचे काम होण्याअगोदर दि. 18 फेबु्रवारी व्हाऊचर क्र. 286 नुसार तब्बल 30 हजार रूपये दिले. पैसे घेऊनही पाखाडीचे काम केले गेले नाही. तत्कालीन सरपंच धनश्री जामसुदकर, ग्रामविकास अधिकारी आर. बी. निलगार व ठेकेदार रवींद्र दशरथ पोळेकर यांनी संगनमताने शासनाची आणि जनतेची फसवणूक करून अपहार केल्याप्रकरणी या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास उपनिरीक्षक दीपक कदम करीत आहेत.

दरम्यान, या पाखाडीवर निधी खर्च पडल्याप्रमाणे काम न झाल्याची ही बाब विद्यमान सरपंच नवनीत ठाकूर यांच्या निदर्शनास आली होती. त्यांनी याबाबत तक्रारही केली होती. परंतु, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या तिघांवर क्र. 2 व 3 चे शासन परिपत्रकातील तरतुदीनुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश 29 डिसेंबर 2017 रोजी गुहागर पं. स. दिले होते. या आदेशामध्ये फौजदारी गुन्हा दाखल केल्याबाबतचा अहवाल 15 दिवसांत गटविकास अधिकारी यांच्याकडून मागविला होता. या नंतर तीन महिने उलटूनही गुहागर पंचायत समितीने यावर कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याचे समोर आले होते. जि. प.चे आदेश असतानाही पं. स. कडून गुन्हा दाखल करावयास विलंब झाला होता. तत्कालीन ग्रामसेवकांनी ग्रामपंचायतच्या बंद असलेल्या बँकेच्या खात्यामध्ये काही रक्कमही भरली होती व हे प्रकरण परस्पर मिटविता येते का, यासाठी प्रयत्न करीत होते. मात्र, त्यांचा हा प्रयत्न फोल ठरला आहे.