Mon, Aug 10, 2020 04:51होमपेज › Konkan › ...तर ‘नाणार’पेक्षा मोठे आंदोलन

...तर ‘नाणार’पेक्षा मोठे आंदोलन

Last Updated: Nov 06 2019 10:30PM
रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरी तालुक्यात शेकडो एकर जागा उद्योगपतींच्या ताब्यात आहे. ती जागा घेऊन एमआयडीसी उभारावी, उद्योगपतींना छळता येत नसल्याने गोरगरीब शेतकर्‍यांना मात्र छळू नका. जाणीवपूर्वक कुणासाठी एमआयडीसीचा घाट वाटद-खंडाळ्यात घातला जात असेल तर नाणारपेक्षाही मोठे आंदोलन या ठिकाणी होईल, असा इशारा म्हाडा अध्यक्ष व आमदार उदय सामंत यांनी दिला. मंजूर झालेली मार्गताम्हाने एमआयडीसी रद्द होऊ शकते, मग वाटद-खंडाळा का नाही, असा प्रश्‍नही आ. सामंत यांनी उपस्थित केला.

वाटद एमआयडीसीला कोणतीही स्थगिती नसल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले होते. त्यामुळे येथील ग्रामस्थांमध्ये शासनाच्या भूमिकेवरून चलबिचल सुरू झाली होती. नागरिकांमध्ये संताप वाढत होता. हा प्रकार आ. सामंत यांना समजताच ते तातडीने वाटद-खंडाळा येथे दाखल झाले. या ठिकाणी त्यांनी बुधवारी शेतकर्‍यांची भेट घेऊन चर्चा केली.

जिल्हाधिकार्‍यांच्या वक्‍तव्यानंतर निर्माण झालेला संभ्रम दूर करताना एमआयडीसी होणार नाही, असे स्पष्टपणे आ. सामंत यांनी सांगितले. मार्गताम्हाणे येथे मंजूर झालेली एमआयडीसी ग्रामस्थांच्या एकीमुळे जाऊ शकते. मग वाटद येथील प्रस्ताविक एमआयडीसी का जाऊ शकणार नाही, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, रत्नागिरी एमआयडीसीने 15 सप्टेंबरला जमीनमालकांना 32 (2) च्या नोटिसा देऊन त्यांच्याकडून हरकती मागवल्या आहेत.  ती प्रक्रिया सुरु आहे.  मात्र, उद्योगमंत्री  सुभाष देसाई यांनी यापूर्वीच एमआयडीसी होणार  नाही असे स्पष्ट केले आहे. त्यानंतर 20 सप्टेंबरला एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकार्‍यांनी आपल्याला पत्र देऊन आपल्याशी, संबंधित जमीनधारक, शेतकरी यांच्याशी चर्चा करुन,भूसंपादन व औद्योगिक क्षेत्राबाबत निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले होते. त्यानंतरही जनतेत संभ्रम निर्माण करणार्‍या प्रशासनाच्या अधिकार्‍यांनाही खडे बोल सुनावले.  या ठिकाणी बुलडोझर लावायची गरज नाही  किंवा 144 कलम लावायची आवशकता नाही.  एखाद्या उद्योजकाला डोळ्यासमोर ठेवून याठिकाणी प्रकल्प आणण्याचा घाट घालू नये.  येथील शेतकरी देशोधडीला लावून, गरिबांना छळून आम्हाला प्रकल्प नको, असेही आ. सामंत यांनी सांगितले.स्टरलाईटची 702 एकर जागा गेली चौदा वर्ष पडून आहे. या उद्योगपतींशी बोलून प्रशासनाने मिनी एमआयडीसी आणावी, असा सल्‍लाही आ. सामंत यांनी दिला.

एमआयडीसी हरकत प्रक्रिया सुरु असली तरीही  उद्योगमंत्र्यांच्या आदेशानुसार स्थानिक शेकर्‍यांशी चर्चा केल्याशिवाय प्रकल्पाचा निर्णय होणार नाही. प्रशासन वा एमआयडीसीने शेतकर्‍यांसोबत राहावे, असे आवाहन आ. सामंत यांनी केले. यावेळी लोकसभा मतदारसंघाचे सहसंपर्कप्रमुख आप्पा पराडकर, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, जि. प. सदस्या सौ. ऋतुजा जाधव, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी प्रशांत पाडाळकर, उपतालुकाप्रमुख प्रकाश साळवी, विभागप्रमुख योगेंद्र कल्याणकर व वाटद पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.