Tue, Jul 14, 2020 11:34होमपेज › Konkan › अशीही एक वारी! दीड एकर भूभागावर साकारली ३४० फुट उंचीची पांडुरंगाची ‘गवत’प्रतिमा

अशीही एक वारी! दीड एकर भूभागावर साकारली ३४० फुट उंचीची पांडुरंगाची ‘गवत’प्रतिमा

Last Updated: Jun 30 2020 7:24PM

दत्तात्रय मारकड यांनी टीपलेले छायाचीत्रकासार्डे (सिंधुदुर्ग) : पुढारी ऑनलाईन

कोरोनामुळे इतिहासात प्रथमच पंढरीची आषाढीवारी खंडीत झाली आहे. शेकडो वर्षांची ही परंपरा थांबल्याने समस्त वारकऱ्यांच्या मनाला एक सल लागून राहिली आहे. मात्र, यंदाची वारीला जाता न आल्याचे दु:ख अनेकांनी वेगळ्या पद्धतीने दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. अशाचप्रकारे गवाणे (ता. देवगड) गावचा हरहुन्नरी यूवा चित्रकार अक्षय मेस्त्रीने गावातल्या दीड एकर भोंड्या माळरानावरील गवत आकर्षकरित्या कातरून तब्बल ३४० फूट उंचीची सुंदर, मनमोहक पांडुरंगाची ‘गवत’प्रतिमा साकारली आहे.

अधिक वाचा : पंढरपूर : आषाढीनिमित्त विठ्ठल-रूक्मिणी मंदिर सजले (photos) 

अक्षय मेस्त्रीने साकरलेल्या ‘गवत’प्रतिमेची उंची ३४० फुट असून रूंदी १५५ फुट आहे. पांडूरंगाच्या चेहऱ्याचीच उंची १३५ फुट आणि लांबी ५० फुट आहे. तर, कपाळावरील टिळ्याची उंची ३१ फुट आणि रुंदी २० फुट आहे. या चित्रानजीक गवताव्दारे तयार केलेले "पांडुरंग" हे नाव तब्बल ३०० फुटाचे साकारण्यात आले आहे. प्रतिमेसाठी असलेल्या आयताची लांबी ४३३ फुट तर रुंदी ३१७ फुट आहे.

अधिक वाचा : उद्या सपत्निक मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा

पांडुरंगाच्या ‘गवत’प्रतिमेचे छायाचित्र घेण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याला तब्बल ६५० फुट उंचीवर स्थिर करावे लागले. एवढी भव्य दिव्य ही कलाकृती आहे. ही कलाकृती साकरण्यासाठी अक्षय मेस्त्री यांना त्यांचे विद्यार्थी तसेच गावातील युवा, तरुण प्रकाश पावरा, गुरुदास साटम, सिद्धेश राणे, रोहित वरक, शुभम राड्ये, ऋषिकेश आयरे व राकेश तोरस्कर यांचेही सहकार्य लाभले.

तुळशीच्या पानावर सुक्ष्म विठ्ठल 

अक्षय मेस्त्री या अवलिया कलाकाराने आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला फक्त एका तासात तुळशीच्या अर्धा इंची पानावर विठ्ठलाचे अतिशय सुंदर आणि सूक्ष्म चित्र रेखाटले. या चित्राची उंची ३ सेंमी व रुंदी फक्त १ सेंमी इतकी सुक्ष्म आहे. यापुर्वीही या युवा कलाकाराने आशाप्रकारे अनोख्या कलेचा आविष्कार सादर केला आहे.