Mon, Sep 21, 2020 17:15होमपेज › Konkan › श्री रामेश्वर व छत्रपतींच्या भेट सोहळ्यासाठी उसळला भाविकांचा सागर!

श्री रामेश्वर व छत्रपतींच्या भेट सोहळ्यासाठी उसळला भाविकांचा सागर!

Last Updated: Feb 15 2020 12:54AM
मालवण : पुढारी वृत्तसेवा

कांदळगावचा स्वयंभू श्री देव रामेश्वर आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदिमाता भवानी देवी यांचा ऐतिहासिक पारंपरिक त्रैवार्षिक भेट सोहळा शुक्रवारी मोठ्या उत्साहात झाला.या शिवकालीन ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी कांदळगाव पंचक्रोशी सह मालवण व्यापारी,मानकरी आशा हजारो भाविकांनी गर्दी केली होती.

कांदळगावचा श्री देव रामेश्वर दर तीन वर्षांनी किल्ले सिंधुदुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीसाठी जातो. शुक्रवारी सकाळी 9 वा. ढोल ताशांच्या गजरात श्री देव रामेश्वराची पालखी भेट सोहळ्यासाठी आपल्या बारापाच पंचायतन, वारेसुत्र, तरंग, व रायतेसह बाहेर पडली.वाटेत पूर्वपर रीतीरिवाजने गार्‍हाणी करून श्री देव किल्ले भेटीसाठी रवाना झाले. या त्रैवार्षिक भेट सोहळ्यात साकारण्यात आलेला देखावा लक्षवेधी ठरला. या भेटीसाठी श्री देव रामेश्वर देवस्थान व परिसर देवलये विश्वस्त मंडळ मानकरी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ   उपस्थित होते.

या भेट सोहळा निमित्त  ओझर येथे  किल्ला ब्राह्मण ज्ञातीबांधव, जय परशुराम ग्रुप तर्फे प्रसाद वाटप करण्यात आले.कातवड,रेवंडी, कोळंब, आडारी,न्हीवे,येथील ग्रामस्थाच्या वतीने स्वागत करण्यात आले. या ग्रामदेवतेच्या स्वागतासाठी ग्रामस्थांनी पालखी मार्गावर सडा रांगोळी, गुढ्या तोरणे, सभामंडप घालून  स्वागत केले.देवा सोबत सहभागी  भक्तांना अल्पोपहार, पाणी, सरबत यांचे वाटप  ग्रामस्थ, मित्रमंडळांच्या वतीने करण्यात आले.

 कोळंब पूल येथे मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर,व व्यापारी बांधवांनी श्री देव रामेश्वराचे स्वागत केले.   त्या नंतर श्री देव रामेश्वर रीतीरिवाजाप्रमाणे जोशीवाडा महापुरुष येथे दाखल झाला. श्री देव रामेश्वरासोबत असणार्‍या देवतांची वारेसूत्र, तरंग व रयतेसह सर्वांना गूळ पाणी देऊन योग्य ती सेवाचाकरी केली. त्यानंतर जोशी परिवाराकडून रामेश्वराला सिंधुदुर्ग किल्ल्यावर होडीच्या साहाय्याने सुखरूप सोडण्यात आले. जोशीवाडा याठिकाणी भाविकासाठी अल्पोपहार देण्यात आला. सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती श्री शिवाजी महाराज व महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदिमाया भवानी माता यांच्या ऐतिहासिक भेटीनंतर श्री देव रामेश्वराला त्याच होडीने दांडी येथे सुखरूप पोहोचविण्यात येते अशी प्रथा आहे. यासाठी जोशीवाडा बाळगोपाळ मित्रमंडळ सिंधुदुर्ग किल्ला वेल्फेअर असोसिएशन मालवण, शिवशक्ती जलपर्यटन संस्था, रामचंद्र महादेव आचरेकर यांचेही फार मोठे सहकार्य लाभले.

नजराणा देऊन रंगला भेट सोहळा...

श्री देव रामेश्वर सिंधुदुर्ग किल्ल्यावर गेल्यानंतर किल्यावरील मानकरी सकपाळ कुटुंबीय यांनी स्वागत केलं. त्यानंतर श्री देव रामेश्वराला छत्रपती कडून शेले- पागोटे देऊन सन्मानीत करण्धात आले. अन्य देवता व वारेसूत्र यांचा ही सन्मान करण्यात आला. तर श्री देव रामेश्वराकडून छत्रपती शिवाजी महाराजांना जिरे टोप, शाल, वस्त्रालंकार देऊन सन्मान करण्यात आला. हा ऐतिहासिक क्षण डोळ्यात साठविण्यासाठी शिवराजेश्वर मंदिरात भाविकांनी एकच गर्दी केली होती.  महाराष्ट्राची कुलस्वामिनी भवानी माता मंदिरात श्रीदेव रामेश्वर व अन्य देवतांनी भेट देत शुभ आशीर्वाद आदान प्रदान केले.किल्ले सिंधुदुर्ग वरील अन्य मंदिरा ना ही भेट दिली.

आज  श्री देव रामेश्वर परतणार मुक्कामी 

किल्ले त्रैवार्षिक भेट सोहळ्यानंतर सायंकाळी 4  वा. नंतर देव दांडेश्वर मंदिरास श्री देव रामेश्वर सह अन्य देवतांनी भेट दिली.  रात्रौ मेढा मालवण येथे मुक्काम ,15 रोजी सकाळी 8 वा. कुशेवाडा- मेढा येथे प्रकाश कुशे यांच्या घरी पारंपरिक भेट, सकाळी 10 वा. रामेश्वर मांड बाजारपेठ येथे आगमन, दुपारी 12  वा. रामेश्वर मांड मंडळा तर्फे उमेश नेरुरकर यांच्या निवासस्थानी महाप्रसादाचे आयोजन, सायंकाळी 4 वा. रामेश्वर मांड येथून रामेश्वर मंदिर कांदळगाव येथे आपल्या मुक्कामी प्रयाण करणार आहे.

 "