Wed, Aug 12, 2020 09:09होमपेज › Konkan › शिमगोत्सवाचे ढोल आजपासून घुमणार!

शिमगोत्सवाचे ढोल आजपासून घुमणार!

Published On: Feb 20 2018 1:17AM | Last Updated: Feb 19 2018 10:28PMरत्नागिरी : प्रतिनिधी

कोकणचे वेगळेपण दर्शविणारा खास सण म्हणजे शिमगोत्सव! या शिमगोत्सवाच्या फाका आता सुरू झाल्या असून जिल्हाभरात गावागावांत शिमगोत्सवाच्या तयारीला जोर आला आहे. जिल्ह्याभरात यंदा 1 हजार 161  सार्वजनिक तर 2 हजार 800 खासगी होळ्या उभ्या राहणार आहेत. याचबरोबर गावागावात ग्रामदेवतांच्या 748 पालख्या निघणार आहेत. यंदाच्या शिमगोत्सवाला 20  फेब्रुुवारी रोजी फाक पंचमी दिनी प्रारंभ होणार असून 2 मार्च रोजी धुलीवंदन होणार आहे.

कोकणात शिमगोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. नोकरीनिमित्त बाहेरगावी गेलेले चाकरमानी शिमगोत्सवासाठी मोठ्या संख्येने कोकणात दाखल होतात आणि फाकांनी, ढोलांच्या निनादाने अवघे कोकण दणाणून निघते. याचबरोबर आपापल्या ग्रामदेवतांवरील ग्रामस्थांची नि:स्सीम भक्‍ती शिमगोत्सवात पहायला मिळते. मानकरी, गावकरी, सारे मिळून शिमगोत्सव गुण्या-गोविंदाने साजरा करतात. होळी हा शिमगोत्सवाचा अविभाज्य भाग. फाक पंचमीला गावागावांत होळ्या उभ्या करण्यात येतात. प्रत्येक गावच्या शिमगोत्सव साजरा करण्याच्या प्रथा परंपरेत थोडीफार तफावत दिसून येते. यंदा जिल्हाभरात 1 हजार 161  सार्वजनिक, तर 2 हजार 800 खासगी होळ्या उभ्या राहाणार आहेत. यामध्ये रत्नागिरी शहरात 16 सार्वजनिक आणि 107 खासगी तर रत्नागिरी ग्रामीणमध्ये 72 सार्वजनिक आणि 130 खासगी होळ्या उभ्या राहणार आहेत.

जिल्ह्यात जयगडमध्ये 25 सार्वजनिक, 140 खासगी, राजापूर -104 सार्वजनिक, 142 खासगी, नाटे -10 सार्वजनिक, 57 खासगी, लांजा -96 सार्वजनिक, 114 खासगी, देवरूख 11 सार्वजनिक, 87  खासगी, संगमेश्‍वर 79 सार्वजनिक, 168 खासगी, चिपळूण-97 सार्वजनिक, 173 खासगी, गुहागर-46 सार्वजनिक, 230 खासगी, सावर्डे -43 सार्वजनिक, 250 खासगी, अलोरे-28 सार्वजनिक-85 खासगी, खेड -225 सार्वजनिक, 380 खासगी, दापोली - 150 सार्वजनिक, 375 खासगी, मंडणगड-75 सार्वजनिक, 165 खासगी, बाणकोटमध्ये 30 सार्वजनिक, 75 खासगी, पूर्णगड -30 सार्वजनिक 65 खासगी, दाभोळमध्ये 24 सार्वजनिक, 57 खासगी होळ्या उभ्या रहाणार आहेत. याचबरोबर 748  ग्रामदेवतांच्या पालख्यांचे आगमन होणार आहे. 2017 मध्ये काही गावांमधून मानपानावरुन वाद असल्याने त्या गावातून बंदी आदेश जारी करण्यात आलेले होते. त्यामुळे 2018 मध्ये शिमगोत्सवाच्या अनुषंगाने पोलिस ठाणे प्रमुखांना अशा गावांमध्ये गाव तंटामुक्‍ती योजनेच्या माध्यमातून बैठका घेऊन वाद मिटवण्याचा प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.