Sun, Jul 12, 2020 22:27होमपेज › Konkan › समाज कल्याण विभागातील वरिष्ठ सहाय्यक लाचलुचपतच्या जाळ्यात

समाज कल्याण विभागातील वरिष्ठ सहाय्यक लाचलुचपतच्या जाळ्यात

Last Updated: Dec 04 2019 1:06AM
सिंधुदुर्गनगरी ः प्रतिनिधी

एका दिव्यांग व्यक्‍तीने स्वयंरोजगारासाठी केलेला अर्ज मंजूर करण्यासाठी त्याच्याकडून अडीच हजार रुपयांची लाच स्वीकारताना जिल्हा परिषद समाज कल्याण विभागातील वरिष्ठ सहाय्यक विद्याधर राजाराम पवार (वय 52) याला लाचलुचपत विभागाच्या पथकाने मंगळवारी दुपारी 1.30 वा. रंगेहाथ ताब्यात घेतले. या कारवाईमुळे जिल्हा परिषद भवनात खळबळ उडाली.
जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाकडून दिव्यांगांसाठी मोठ्या प्रमाणावर योजना राबविल्या जातात. तक्रारदार दिव्यांग व्यक्‍तीने स्वयंरोजगारासाठी 25 हजार रुपयांचे बीज भांडवल मिळावे म्हणून समाज कल्याण विभागात अर्ज केला होता. 

हे प्रकरण मंजूर करण्यासाठी संशयित पवार यांनी दिव्यांगाजवळ 2500 रुपयांची मागणी केली. अशी तक्रार संबधित दिव्यांगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांकडे 2 डिसेंबर रोजी केली. त्या नंतर मंगळवारी दुपारी तक्रारदाराकडून वरील रक्‍कम स्वीकारताना विद्याधर पवार याला ताब्यात घेतले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील, अतिरिक्‍त पोलीस अधीक्षक मुकुंद हातोटे, उपअधीक्षक दीपक कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नितीन कुंभार, मितेश केणी, पोलीस कॉन्स्टेबल अजित खांडे, प्रथमेश पोतनीस यांच्या पथकाने केली.

जि. प. परिसरातच कारवाई

संशयित विद्याधर पवार यांना अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने जिल्हा परिषद प्रवेशद्वारावर असलेल्या टपाल कार्यालयाजवळच रंगेहात ताब्यात घेतले. समाजकल्याण विभाग या पासून हाकेच्या अंतरावर आहे. याबाबत माहिती देताना पोलिस उपअधीक्षक दीपक कांबळे म्हणाले, संशयित पवार याच्यावर लाच घेतल्या प्रकरणी सिंधुदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून त्याला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तक्रारदाराने तक्रार केल्यानंतर लागलीच दुसर्‍या दिवशी कारवाई करत संशयिताला ताब्यात घेतले. अशा काही तक्रारी असल्यास पुढे या, आमच्याशी संपर्क साधा, असे आवाहन उपअधीक्षक कांबळे यांनी केले.