Mon, Aug 10, 2020 03:53होमपेज › Konkan › जनसामान्यांची लालपरी झाली ७० वर्षांची!

जनसामान्यांची लालपरी झाली ७० वर्षांची!

Published On: Jun 01 2018 2:05AM | Last Updated: May 31 2018 10:07PMरत्नागिरी : विशाल मोरे

महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य लोकांना खेड्यांपासून ते शहरापर्यंत जोडणारी एसटीची ही एक सामाजिक बांधिलकी निर्माण करणारी सेवा आहे. अनेक वाड्या आणि खेड्यांपासून शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांचे हक्‍काचे वाहन म्हणजे एसटी होय. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ या ब्रीदाला जागणारी जनसामान्यांची ‘लालपरी’ अर्थात एसटी शुक्रवार दि. 1 जून रोजी आपला 70वा वर्धापन दिन साजरा करीत आहे. 

अहमदनगर-पुणे मार्गावर  1 जून 1948 रोजी पहिली एसटी धावली. त्यामुळे  दरवर्षी हा दिवस ‘वर्धापन दिन’ म्हणून साजरा केला जातो. राज्यातील लाखो प्रवाशांची लाईफलाईन समजल्या जाणार्‍या एस.टी. बसने अनेक चढ-उतार घेत 70 वर्षांची यशस्वी वाटचाल केली आहे. याबद्दल सांगायचे झाल्यास 1947 साली भारत स्वतंत्र राष्ट्र घोषित झाले आणि दुसर्‍याच वर्षी म्हणजे 1948 साली पहिली, चंदेरी छताची निळी बस पुणे ते अहमदनगर जिल्ह्यांदरम्यान धावली. चालक आणि मार्गदर्शकांना खाकी गणवेश व टोपी असा पोषाख होता. त्याकाळी, शेवरले, फोर्ड, बेडफोर्ड, सेडान, स्टडबेकर, मॉरिस कमर्शिअल, अल्बिओन, लेलँड, कोमर आणि फियाट या दहा कंपन्यांच्या बसगाड्या वापरात होत्या. त्यानंतर 1950 मध्ये, मॉरिस कमर्शिअल कंपनीच्या दोन आरामदायी सुविधा असणार्‍या बस चालवण्यात आल्या. त्या ‘नीलकमल’ आणि ‘गिर्यारोहिणी’ नावाने प्रसिद्ध होत्या. पुणे ते महाबळेश्‍वर मार्गावर या गाड्या धावत.

पुढे भाषिक आधारावर राज्य पुनर्रचनेनंतर मुंबई, मध्यप्रांत आणि संपुष्टात आलेल्या निझाम राज्याचा भाग मिळून महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली. त्या भागातील वाहतूक सेवा करीत असलेल्या संस्थाही ‘बीएसआरटीसी’मध्ये विलीन करून नव्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) या नावाने महामंडळाचा कारभार सुरु राहिला. 30 लाकडी बॉडी असलेल्या बेडफोर्ड बसेस घेऊन महामंडळाचा प्रवास सुरु झाला. कालांतराने महामंडळाने अनेक बदल करत एसटीच्या सुविधा वाढविल्या. लाकडी ऐवजी आता अ‍ॅल्युमिनियम बॉडीच्या बस आल्या. कुशन असलेल्या सीट वापरण्यात आल्या आणि  1956 पासून रातराणी सेवा सुरु करण्यात आली. निळ्या रंगाच्या बस आता लाल झाल्या आहेत. 1982 साली एशियन गेम सुरु असताना निमआराम बस सुरु करण्यात आली. मुंबई, पुणे, नाशिक औरंगाबाद अमरावती आणि नागपूर असे एसटीचे सहा विभाग आहेत.

आज एसटीकडे वाहतूक सेवेसाठी सुमारे 15 हजारांहून अधिक वाहने आहेत. काही दिवसांपूर्वी ‘शिवशाही’ या बसेस दाखल झाल्या आहेत. या बसमध्ये 47 आसने आहेत, लॅपटॉप, मोबाईलची सोय, एलईडी स्क्रीन, वायफाय अशा अत्याधुनिक सुविधा आहेत. 

वर्धापनदिनानिमित्त सर्व आगार व बसस्थानकांवर या दिवशी सडा घालून, रांगोळी काढून, झेंडूची फुले, आंब्याची पाने यांचे तोरण बांधण्यात येणार आहे. दर्शनी बाजूस केळीच्या खांबाच्या स्वागत कमानी उभरण्यात येणार आहेत. या दिवशी प्रत्येक कर्मचारी त्याला मिळालेला नवीन गणवेश परिधान करून येणार आहे. सकाळी 10 वा. प्रवासी व कर्मचार्‍यांना पेढे वाटून वर्धापनदिनाच्या शुभेच्छा देण्यात येणार आहेत. यानिमित्त ‘शिवशाही’तून प्रवास करणार्‍या ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात सवलत योजना सुरू करण्यात येणार आहे. तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.