Tue, Jan 19, 2021 16:42होमपेज › Konkan › सिंधुदुर्गात यंदा 37 हजार क्विंटल विक्रमी भात खरेदी

सिंधुदुर्गात यंदा 37 हजार क्विंटल विक्रमी भात खरेदी

Last Updated: May 23 2020 1:41AM
कणकवली : अजित सावंत

सुधारित व संकरित भात बियाणे आणि यांत्रिक शेतीमुळे एकीकडे सिंधुदुर्गातील भातशेतीच्या उत्पादनात वाढ होत असतानाच दुसरीकडे यावर्षी जिल्ह्यात विक्रमी 36 हजार 882.13 क्विंटल भात खरेदी झाली आहे. विशेष म्हणजे, गतवर्षीच्या तुलनेत 11 हजार क्विंटलने त्यात वाढ झाली आहे. शेतकर्‍यांना प्रति क्विंटल 1850 रुपये अधिक 700 रुपये बोनस असा मिळून 2550  रु. प्रति क्विंटल इतका घसघशीत दर मिळाला आहे. यावर्षी जानेवारीपासूनच भातखरेदी सुरू झाल्याने वेळेवर शेतकर्‍यांना भात विक्री करता आली आणि त्यांना चांगला दरही मिळाला.  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकर्‍यांसाठी समाधानाची आणि दिलासा देणारी ही बाब आहे. 

सिंधुदुर्ग जिल्हा हा कृषिप्रधान जिल्हा आहे. सिंधुदुर्गात एकेकाळी भातशेती हेच प्रमुख पीक होते; मात्र गेल्या 10-15 वर्षांत कमी झालेले मनुष्यबळ, घटलेले पशुधन यामुळे भातशेतीच्या उत्पादनात मोठी घट झाली होती. उत्पादनातील खर्च आणि प्रत्यक्ष उत्पादन यात ताळमेळ बसत नसल्याने तसेच भाताला त्या तुलनेत चांगला दर नसल्याने भातशेती करणे परवडत नसल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे होते. सुधारित आणि संकरित भात बियाणांमुळे कमी क्षेत्रात अधिक क्षेत्र लागवडीखाली येत होते आणि भात उत्पादन वाढले ही थोडीशी जमेची बाजू होती. परंतू मनुष्यबळाअभावी जनावरे कमी झाल्याने औतांची संख्याही घटली होती. मात्र गेल्या पाच वर्षांपासून सिंधुदुर्गात यांत्रिक शेतीकडे शेतकर्‍यांचा कल वाढला आहे. परिणामी शेतीपासून दुरावलेले शेतकरी पुन्हा एकदा भातशेतीकडे वळले.  त्यामुळे जिल्ह्यातील भात उत्पादनही वाढले आहे. 

सिंधुदुर्गात जवळपास 70 हजार हेक्टर क्षेत्रावर दरवर्षी भात लागवड केली जाते,  भाताचे उत्पादन वाढले तरी भाताला चांगला दर नसल्याने शेतकर्‍यांचे नुकसान होत होते. शासनाकडून  भात खरेदी वेळेवर होत नसल्याने शेतकर्‍यांना, व्यापार्‍यांना भात विकावे लागत असे. यामध्ये शेतकर्‍यांपेक्षा दलालांचा अधिक फायदा होत होता. मात्र शासनाने गेल्या दोन वर्षांपासून भाताला 1800 रू. प्रतिक्विंटल दर देण्यास सुरूवात केली आणि त्यावर 500 रू. बोनस असा मिळून गतवर्षी 2300 रू. पर्यंत प्रतिक्विंटल दर मिळाला होता. शासनाने यावर्षी प्रतिक्विंटल बोनसमध्ये 200 रू. वाढ करून 700 रू. बोनस केला, त्यामुळे 1850 प्रतिक्विंटल आणि 700 रू. बोनस असा मिळून 2550 रू. दर शेतकर्‍यांना प्रतिक्विंटल भाताला मिळाला. पूर्वी मार्चमध्ये भात खरेदीस सुरूवात व्हायची. मात्र यावर्षी जानेवारीपासूनच भात खरेदीस सुरूवात केली. सिंधुदुर्ग जिल्हा मार्केटींग फेडरेशनच्यावतीने शेतकरी संघामार्फत भात खरेदीची 16 केंद्रे सुरू करण्यात आली. या केंद्रांच्या माध्यमातून आतापर्यंत जिल्ह्यात 36 हजार 882.15 क्विंटल भात खरेदी झाली आहे. विशेष म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत 18 हजार क्विंटल भात खरेदी वाढली आहे, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी नामदेव गवळी यांनी दिली. 

भात खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी भात खरेदी केंद्रांना 2 टक्के कमिशन आणि भाताची उचल होईपर्यंत जागेचे भाडे शासन देते. तसेच खरेदीसाठी बारदानेही उपलब्ध केली. त्यामुळे यावर्षी मोठ्या प्रमाणावर वेळेवर भातखरेदी झाली आणि शेतकर्‍यांनाही चांगले पैसे मिळाले. त्यामुळे भातशेतीकडे शेतकर्‍यांचा कल पुन्हा वाढणार आहे. 

कुडाळ तालुक्यात सर्वाधिक भात खरेदी

कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आ. वैभव नाईक यांनी गेल्या पाच वर्षांत यांत्रिक शेतीसाठी शेतकर्‍यांना प्रोत्साहित केले. शासनाकडून मोठ्या प्रमाणावर अनुदान तत्त्वावर या तालुक्यात शेतकर्‍यांना यंत्रसामग्री उपलब्ध करून दिली, तसेच भात खरेदी लवकरात लवकर होण्यासाठी आणि भाताला चांगला दर मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला. त्याचेच फलित म्हणून यावर्षी कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 18 हजार क्विंटल भात खरेदी झाली आहे. पुढील वर्षी त्यात आणखी वाढ अपेक्षित आहे. यावर्षी वेळेवर भात खरेदी झाली आणि शेतकर्‍यांना चांगला दरही मिळाला. पुढील वर्षी नोव्हेंबर, डिसेंबरपासूनच भात खरेदी सुरू करण्यासाठी आपले प्रयत्न आहेत. शेतकरी संघांनीही यासाठी शासनाला सहकार्य करणे आवश्यक असल्याचे आ. वैभव नाईक यांनी सांगितले.