Fri, Apr 10, 2020 15:02होमपेज › Konkan › वाचन संस्कृतीला मरण नाही : मेहता

वाचन संस्कृतीला मरण नाही : मेहता

Last Updated: Dec 28 2019 9:51PM
चिपळूण : खास प्रतिनिधी

वाचन संस्कृतीला केव्हाही मरण नाही. डिजिटल पुस्तके हे वाचन संस्कृतीवर संकट नसून ती एक संधी आहे. त्यामुळे आज भारतीय भाषांमधील डिजिटल पुस्तकांना जगभरात अधिक खप आहे. प्रकाशकांनी चांगले लेखक शोधले पाहिजेत. काळानुरूप वाचकांना साहित्य दिले पाहिजे आणि त्यामध्ये बदल केला पाहिजे, असे मत दुसर्‍या लेखक-प्रकाशक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अनिल मेहता यांनी येथील नानासाहेब जोशी नगरीत व्यक्त केले.

शहरातील वीरेश्वर मंदिराच्या प्रांगणात नानासाहेब जोशी नगरीमध्ये दुसर्‍या लेखक-प्रकाशक साहित्य संमेलनाचे उद्घाटन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते झाले. यावेळी स्वागताध्यक्ष म्हणून जिल्हा बँकेचे अध्यक्ष व साहित्यिक डॉ. तानाजीराव चोरगे, भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, अ. भा. मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे,  ‘पानिपत’कार विश्वास पाटील, प्रा. मिलिंद जोशी, सुरेश बेहेरे, लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे अध्यक्ष अरुण इंगवले, कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे,पराग लोणकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी अध्यक्षीय भाषणात मेहता म्हणाले, लेखक आनंद यादव यांनी आपल्यातील पुस्तकाची ओढ ओळखली आणि पुस्तक प्रकाशनमध्ये उतरण्याचा सल्ला दिला. त्यामुळेच रणजित देसाई, विश्वास पाटील या दिग्गज लेखकांनी आपल्यावर विश्वास दाखविला अशी कबुली दिली. मराठीतील प्रकाशन व्यवसाय प्रारंभीच्या काळात मुंबईत एकवटला होता. मात्र, 1930 नंतर तो पुण्याकडे स्थलांतरित झाला. मात्र, आज महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात अनेक छोटे-मोठे प्रकाशक आहेत. त्यामुळे वाचन संस्कृतीला मरण नाही असे त्यांनी अधोरेखीत केले. सामाजिक जीवनात संस्कृतीचा प्रकाश उजळवायचा असेल तर आपल्याला पुस्तकांचीच सोबत धरायला हवी. सोशल मीडियासारख्या माध्यमाने आज नव्या लेखकांना मुक्त व्यासपीठ मिळवून दिले आहे. त्यातून लेखनाचे कसब असणारे लेखक शोधता येऊ शकतात आणि त्यांना पुस्तक निर्मितीसाठी लिहिते करता येऊ शकते. यातून लेखक-प्रकाशक संबंधाना नवा आयाम मिळू शकतो. आज वाचकांची रूची ओळखून पाऊले टाकायला हवीत. जागतिक प्रकाशकांशी संवाद साधण्यात आपण कमी पडत आहोत, असे त्यांनी ठामपणे सांगितले. 

मराठीचा पुरस्कार करणारे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे संमेलनाध्यक्ष अनिल मेहता यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वागत करतानाच त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केल्या. सरकारकडून शासनमान्य पुस्तकांची यादी दरवर्षी जाहीर करावी, 2012 नंतर नव्या वाचनालयास मान्यता मिळालेली नाही, त्यामुळे राज्य शासनाने त्याकडे लक्ष देऊन या वाचनालयांना मंजुरी द्यावी. वाचनालये व महाविद्यालयातील ग्रंथालये यांना पुस्तक खरेदीसाठी अनुदान द्यावे, राजा राममोहन रॉय फाऊंंडेशन मार्फत होणार्‍या पुस्तक खरेदीतील जाचक अटी शिथील कराव्यात, शासनमान्य ग्रंथालयांची अद्ययावत यादी जाहीर करावी, शाळांसाठी वेतनेतर अनुदान सुरू करावे, शासनाने मराठी पुस्तक इतर भाषांमध्ये अनुवादीत केल्यास त्यास पुरस्कार द्यावा, पुस्तकांच्या पायरसी संदर्भात गंभीर दखल घ्यावी, मराठीत प्रकाशित झालेल्या पुस्तकांची सूची जाहीर करावी, शासकीय ग्रंथोत्सव सुरू करावा, युवक व वाचकांना आकर्षित करणार्‍या योजना आखाव्यात. त्यातून वाचन संस्कृतीचे जतन होईल, अशा भावना मेहता यांनी व्यक्त केल्या.