Sat, Jul 11, 2020 09:51होमपेज › Konkan › देवगड येथे क्वारंटाईन तरुणाची आत्महत्या

देवगड येथे क्वारंटाईन तरुणाची आत्महत्या

Last Updated: Jul 02 2020 7:57AM
देवगड : पुढारी वृत्तसेवा

लॉजमध्ये क्वारंटाईनमध्ये असलेल्या युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याने देवगडमध्ये खळबळ उडाली आहे. रणजित सुनील घाडीवट्टार मोहिते (वय 22, रा. कोल्हापूर) असे या युवकाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी सकाळी 11.30 वा. सुमारास उघडकीस आली. रणजित घाडीवट्टार मोहिते हा युवक वाडातर येथील आनंद ढोके यांच्याकडे कामाला होता. 21 जून रोजी तो कोल्हापूर येथे घरी आईला भेटून देवगड येथे आला होता.

कोल्हापूर येथून आल्यानंतर 21 रोजी त्याला देवगडमधील एका लॉजमधील रूमवर क्वारंटाईन करण्यात आले होते. मंगळवारी सकाळी 11 वा. त्याला जेवणाचा डबे देणारा माणूस लॉजवर  त्याजवळील जेवणाचा डबा घेण्यासाठी  गेला. त्याने रणजीत याला हाक मारली. मात्र त्याने प्रतिसाद दिला नाही म्हणून त्यांनी लॉज मालकाला याबाबत सांगितले.लॉज मालकानेही त्याचा रूम जवळ येवून त्याला हाक मारली. बर्‍याच वेळा हाका मारूनही त्याच्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने लॉजमालकांनी तो ज्याच्याकडे कामाला होता त्या आनंद ढोके यांना फोन करून सांगितले.

आनंद ढोके हे  मित्रासमवेत लॉजजवळ आले. त्याचा मित्रांनी खिडकीच्या फटीतून पाहिले रणजीत हा गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आला. यानंतर रूमचा दरवाजा तोडला असता रणजीत याने  छताच्या हुकाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. या घटनेची खबर लॉजमालकांनी देवगड पोलिस स्थानकात दिली. पोलिसांनी  घटनास्थळी पंचनामा केला व आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली. अधिक तपास स.पो.निरिक्षक संजय कातिवले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.एस्.डी.कांबळे करीत आहेत. रणजीत याने आत्महत्या का केली? याचे कारण स्पष्ट झालेले नाही.