दोडामार्ग : प्रतिनिधी
कळणे गावातील शाळकरी विद्यार्थिनीवर अतिप्रसंग केल्याप्रकरणी दोडामार्ग पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा अजित अर्जुन देसाई (वय 30, रा. केर) याला नेतर्डे गावातून ताब्यात घेतले. त्याच्यावर पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपासी अधिकारी म्हणून कुडाळ येथील महिला पोलिस अधिकारी शीतल पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे.
शनिवारी दुपारी शाळेतून घरी जाणार्या विद्यार्थिनीचा अजित देसाई याने पाठलाग करत तिला निर्जनस्थळी गाठून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी पीडित विद्यार्थिनीने त्याला जोरदार प्रतिकार करत आरडाओरड केल्याने लगतच्या बागेत काम करणार्या कामगारांनी धाव घेतली होती. त्यावेळी अजित देसाई हा पळून गेला होता. दरम्यान, त्याच्या पायातील एक बूट घटनास्थळी आढळून आला होता. याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला. तपासादरम्यान अजित हा नेतर्डे येथे आपल्या बहिणीच्या घरी लपून बसल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी रात्री उशिरा तेथे जात त्याला ताब्यात घेतले. दोडामार्ग पोलिस स्थानकात त्याच्यावर कलम 8, 12 व 354 अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.