Tue, Jul 07, 2020 08:34होमपेज › Konkan › झुलते हळूच भालचंद्र बाबांची पालखी..!

झुलते हळूच भालचंद्र बाबांची पालखी..!

Last Updated: Dec 04 2019 1:06AM
कणकवली : प्रतिनिधी

योगीयांचे योगी, असंख्य भाविक भक्‍तांचे श्रद्धास्थान परमहंस भालचंद्र महाराज यांचा 42 वा पुण्यतिथी दिन मंगळवारी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.

पहाटेच्या काकड आरतीपासून सुरू झालेला भालचंद्र बाबांचा जयघोष रात्री उशिरापर्यंत सुरू होता. ‘दिगंबरा दिगंबरा भालचंद्र बाबा दिगंबरा’ अशा जयघोषाने अवघी कनकनगरी भालचंद्रमय झाली आणि सारे भक्‍तगण बाबांच्या चरणी लीन झाले. सायंकाळी परमहंस भालचंद्र महाराज यांची भव्य पालखी मिरवणूक शहरातून काढण्यात आली. या मिरवणुकीने आणि बाबांच्या नामघोषाने कनकनगरी दुमदुमून गेली होती. ‘निघालो घेवून बाबांची पालखी, आम्ही भाग्यवान आनंद निधान, झुलते हळूच बाबांची पालखी...’ असाच हा नयनरम्य पालखी सोहळा होता. 

परमहंस भालचंद्र महाराज यांचा 42 वा पुण्यतिथी उत्सव गेले पाच दिवस भक्‍तीमय वातावरणात आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. प्रत्येक दिवशी जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यातून आणि देश-विदेशात स्थायिक झालेले बाबांचे भक्‍तगण हजारोंच्या संख्येने या सोहळ्याला उपस्थिती दशर्वत होते. मंगळवारी बाबांचा 42 वा पुण्यतिथी दिन होता.  यानिमित्त बाबांची समाधी श्‍वेत निलकांत पुष्पपुजेने सजविण्यात आली होती. पहाटेच्या आल्हाददायक वातावरणात काकड आरतीस प्रारंभ झाला आणि शेकडो भाविक भक्तांनी आपल्या स्वरसुमनांनी बाबांच्या चरणी अभिषेक केला. एक वेगळेच भारलेले वातावरण या निमित्ताने भक्तांना अनुभवता आले. त्यानंतर जपानुष्ठानालाही मोठी गर्दी होती. मग भक्तांची लगबग सुरू झाली ती बाबांच्या समाधी दर्शनासाठी. ‘याची देही याची डोळा’ बाबांची मूर्ती आणि समाधी दर्शन डोळ्यात साठवण्यासाठी प्रत्येकजण आतुरलेला होता. एव्हाना सुश्राव्य भजनेही सुरू झाली. त्यानंतर समाधी स्थानी मन्यूसुक्‍तपंचामृताभिषेक करण्यात आला.  

तोपर्यंत दुपारच्या महाआरतीची वेळ झाली होती आणि आरतीला हजारो भाविकांनी उपस्थिती दर्शविली. संस्थानचा आवार भक्‍तांच्या अलोट गर्दीने फुलून गेला होता. त्यानंतर हजारो भाविकांनी अतिशय शिस्तबद्धरित्या महाप्रसादाचा लाभ घेतला. त्यानंतर नामवंत भजनीबुवांनी आपली भजनकला बाबांच्या चरणी अर्पण केली. सायंकाळपर्यंत समाधी दर्शनासाठी भक्‍तांचा ओघ सुरू होता. तोपर्यंत सायंकाळचे 5 वाजले होते आणि लगबग सुरू झाली ती बाबांच्या पालखी सोहळ्याची. आकर्षक अशा फुलांनी आणि रोषणाईने बाबांची पालखी सजविण्यात आली होती. तर पालखी मार्गावर कणकवलीकरांनी सडारांगोळ्या काढल्या होत्या. बाबांची भक्तीगीते लावण्यात आली होती. पालखीत सहभागी भक्तांना अल्पोहार आणि सरबत व्यवस्था करण्यात आली होती. घोटे, उंट तसेच सिंधुदुर्ग वारकरी सांप्रदायाच्या समवेत कणकवली शहरातून पालखी सोहळ्यास प्रारंभ झाला. 

खरोखरच हा पालखी सोहळा नयनरम्य होता. ढोलताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत पालखी निघाली, जणू बाबाच पालखीत विराजमान झाले आहेत अशी अनुभूती भक्‍तांना येत होती.  शेकडो भाविक भक्‍तगण या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. ठिकठिकाणी या पालखीचे पूजन करण्यात आले. या पालखी सोहळ्याने कनकनगरी भक्‍तीरसात न्हावून निघाली. प्रत्येकाच्या मुखी होते ते भालचंद्र बाबांचे नाव. ‘दिगंबरा दिगंबरा भालचंद्र बाबा दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ असा जयघोष प्रत्येकाच्या मुखी होता. रात्रो पालखी संस्थानमध्ये गेल्यानंतर आरती झाली आणि रात्रो उशिरा भालचंद्र दशावतार नाट्यमंडळ हळवल यांचा दशावतारी नाट्यप्रयोग झाला. 

गेल्या पाच दिवसांत बाबांच्या पुण्यतिथी उत्सवात भाविक भक्तांनी आपापल्यापरीने बाबांच्या चरणी आपली सेवा रूजू केली. परमहंस भालचंद्र महाराज संस्थानने भाविक भक्तांच्या सहकार्याने आणि बाबांच्या कृपाशीर्वादाने हा पुण्यतिथी सोहळा पार पाडला. जानेवारी महिन्यात 12 ते 16 जानेवारी दरम्यान बाबांचा जन्मोत्सव सोहळा साजरा होणार आहे.