Fri, Aug 07, 2020 15:35होमपेज › Konkan › आजपासून दिवसाआड पाणी

आजपासून दिवसाआड पाणी

Published On: Jun 07 2019 1:50AM | Last Updated: Jun 07 2019 1:50AM
रत्नागिरी : प्रतिनिधी

रत्नागिरी शहरासह नऊ ग्रामपंचायती मिरजोळे, उद्यमनगर औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करणार्‍या एमआयडीसीच्या हरचिरी  धरणातील पाणीसाठा संपुष्टात आला असून, धरणात खडखडाट झाला आहे.  निवसर व धरण परिसरात मध्येच साठलेले पाणी धरणात आणण्याचा प्रयत्न एमआयडीसीकडून सुरू आहे. त्यामुळे एमआयडीसीने शनिवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.  

दरम्यान, दि. 10 जूनपर्यंत पाऊस न झाल्यास धरण बांधल्यापासून प्रथमच एमआयडीसीचा पाणीपुरवठा पूर्णतः  ठप्प होण्याची शक्यता आहे.एमआयडीसीतील उद्योगांना व रत्नागिरी शहरातील काही भाग, नऊ ग्रामपंचायतींना हरचिरी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा केला जातो. या धरणात सुमारे 297 दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा करण्याची क्षमता आहे. धरण बांधल्यापासून यातील गाळ उपसण्यात न आल्याने पाणी साठ्याची क्षमता कमी झाली आहे. त्यातच गतवर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पुरेसा पाणीसाठा झाला नाही.  कडक उन्हामुळे पाणीसाठ्यात यावर्षी घट झाली होती. त्यामुळे दि 15 मे पासूनच एमआयडीसीला पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या होत्या. महिनाभरापूर्वी पाण्याची परिस्थिती अधिकार्‍यांच्या लक्षात आल्यानंतर एमआयडीसीने पाटबंधारे विभागाच्या शिपोशी धरणातून पाच लाख दशलक्ष घनमीटर पाणी घेतले होते.  त्यातील एक लाख दशलक्ष घनमीटर पाणी हरचिरी  धरणात पोहोचले उर्वरित पाणी  34 किलोमीटरच्या प्रवासात मुरले.

हरचिरी धरणात कमीच पाणी पोहोचल्याने, गेले वीस दिवस पन्नास टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय एमआयडीसीने घेतला होता. कंपन्या व ग्रामपंचायतींना पाण्याचे योग्य नियोजन करण्याच्या  सूचना दिल्या होत्या. मे महिना संपून जूनचा पहिला आठवडा संपत आला तरी मोसमी नाही तर बिगर मोसमी पाऊसही पडला नाही. उन्हाची तीव्रता वाढल्याने, शिल्‍लक पाणीसाठाही संपला आहे.
हरचिरी बरोबरच निवसर, अंजणारी, घाटीवळे व असोडे येथील एमआयडीसीच्या धरणातील पाणी संपले आहे. ज्या शिपोशी धरणातून एमआयडीसीने पाणी घेतले. तेही रिकामे झाल्याने पाण्याचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

हरचिरी धरणाच्या खोलगट भागात बर्‍यापैकी पाणीसाठा असल्याने, हे पाणी उचलण्याचा निर्णय एमआयडीसीने घेतला आहे. त्याचप्रमाणे निवसर दरम्यान अनेक खोलगट भागात बर्‍यापैकी पाणी असून हे पाणीही जेसीबीच्या  मदतीने चर मारुन धरणात आणण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे सध्या तरी दिवसाआड  पाणीपुरवठा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. दहा जूनपयर्र्त पाऊस न पडल्यास भीषण परिस्थितीचा सामना उद्योग, व्यवसाय व नागरिकांना करावा लागणार आहे. त्यामुळे  एमआयडीसीचे अधिकारी पाणी धरणातील विहीरीपर्यंत आणण्यासाठी नियोजन करीत असले तरी पाऊस पडण्याची वाटही पाहत आहेत.